IPL 2025 Auction : आगामी आयपीएलसाठी बीसीसीआय मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यंदाचं आयपीएल ऑक्शन (IPL Mega Auction) मिनी नाही तर मेगा ऑक्शन होणार असल्याने मोठ्या खेळाडूंवर डाव लागण्याची शक्यता आहे. नुकतंच बीसीसीआयने आयपीएल फ्रँचायझींच्या मालकांसोबत मिटींग घेतली अन् काही सुचना मागवल्या होत्या. त्यानंतर आता बीसीसीआय मोठे निर्णय घेऊ शकते. यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंना नारळ मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये रोहित शर्मापासून ऋषभ पंत यांचा देखील समावेश असू शकतो. अशातच आता दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंत (Rishabh Pant in CSK) याच्या एका पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
दिल्लीचा कॅप्टन आणि स्टार विकेटकिपर ऋषभ पंत याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमध्ये पंतने स्वतःचा आणि ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये दोघंही थलैवा स्टाईलने बसले आहेत. ऋषभने हा फोटो शेअर करताच अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. ऋषभ पंतने या फोटोमधून काय सांगायचं आहे? असा सवाल विचारला जात आहे. काहींनी या फोटोवर कमेंट करत वेलकम टू सीएसके, अशी कमेंट केलीये.
ऋषभ पंतने फोटोला थलैवा असं कॅप्शन दिल्याने नेटकऱ्यांनी अनेक तर्कवितर्क लावले आहेत. ऋषभ पंत आता धोनीच्या चेन्नईसाठी खेळणार का? असा सवाल विचारला जात आहे. त्यामुळे आता चेन्नईचे चाहते देखील उत्सुक असल्याचं दिसतंय. फक्त एका फोटोने धोनीच्या चेल्याने सर्वांचीच धाकधूक वाढवली आहे. ऋषभ पंतने आयपीएलच्या सुरूवातीपासून दिल्ली संघाकडूनच आपली झलक दाखवलीये. आता त्याला चेन्नईकडून हात साफ करता येणार का? असा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
दरम्यान, ऋषभ पंतने आयपीएलमध्ये आतापर्यंत 111 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तो 3284 धावांसह संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. 2016 मध्ये पंतने दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. अशातच आता ऋषभ चेन्नईची शिट्टी वाजवेल, असं मानलं जातंय. तर दुसरीकडे दिल्ली ऋषभ पंत सारख्या स्टार खेळाडूला सोडणार का? असा मोठा सवाल देखील आहे.