Pro Kabaddi League: पुणेरी पलटणचा बंगळुरु बुल्सवर दणदणीत विजय, मिळवला 56-18 असा विजय

Puneri Paltan vs Bengaluru Bulls: प्रतिस्पर्धी संघाच्या गुणांपेक्षा तिप्पट गुणांनी विजय मिळवून पुणेरी पलटण संघाने क्रमवारीत सातवे स्थान गाठत बाद फेरी गाठण्याचे आपले आव्हान कायम राखले. 

तेजश्री गायकवाड | Updated: Dec 14, 2024, 07:12 AM IST
Pro Kabaddi League: पुणेरी पलटणचा बंगळुरु बुल्सवर दणदणीत विजय, मिळवला 56-18 असा विजय title=

Puneri Paltan vs Bengaluru Bulls in PKL:  प्रो कबड्डी लीगमध्ये यापूर्वीच आव्हान गमावलेल्या बंगळुरु बुल्स संघाला आणखी निस्तेज करताना एकामागून एक चार लोण देत पुणेरी पलटणने शुक्रवारी झालेल्या सामन्यात 56-18 असा दणदणीत विजय मिळविला. पंकज मोहिते, आकाश शिंदे,  मोहित गोयत यांच्या चढायांना गौरव खत्री आणि अमन यांच्या बचावातील हाय फाईव्हची सुरेख साथ मिळाली. प्रतिस्पर्धी संघाच्या गुणांपेक्षा तिप्पट गुणांनी विजय मिळवून पुणेरी पलटण संघाने क्रमवारीत सातवे स्थान गाठत बाद फेरी गाठण्याचे आपले आव्हान कायम राखले. 

तुलनेत पलटणच्या प्रत्येक खेळाडूने आपली भूमिका चोख बजावली. पंकजने चढाईत ५, मोहित आणि आकाश शिंदेने ८ गुणांची कमाई केली. या तिघांच्या चढाया कमी पडल्या म्हणून की काय आर्यवर्धन नवलेने एक मिनिट शिल्लक असताना एका चढाईत पाच गुणांची कमाई केली. गौरवने ६ आणि अमनने ५ गुणांची कमाई करुन बचावाची बाजू समर्थपणे सांभाळली. सर्वोत्तम सांघिक खेळ हे पलटणच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले असले, तरी संपूर्ण सामन्यात बचाव भक्कम असूनही त्यांनी परदीप नरवालला शांत ठेवण्यात मिळविलेले यश महत्वाचे ठरले. बंगळुरु कडून परदीपने सात गुणांची कमाई केली. 

हे ही वाचा: IND vs AUS 3rd Test: भारत-ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना रद्द होणार? सामन्यापूर्वी ब्रिस्बेनमधून आली मोठी अपडेट

पूर्वार्धातला खेळ 

पूर्वार्धात ढासळलेल्या बंगुळुर संघावरील आपली पकड अधिक घट्ट करताना पलटणने उत्तरार्धाच्या पहिल्याच मिनिटाला बंगळुरु संघावर तिसरा लोण चढवला. यानंतर पलटणचा प्रत्येक चढाईला गुण, बचावात गुण हा वेग उत्तरार्धाच्या पहिल्या सत्रात कायम राहिला. बंगळुरु बुल्स संघ अक्षरशः निष्प्रभ झाला होता. पहिले सत्र संपताना बंगळुरुला आणखी एक लोण स्विकारावा लागला. तेव्हा पलटणने ४३-१२ अशी ३१ गुणांची मोठी आघाडी घेत उत्तरार्धाचे अखेरचे सत्र औपचारिक राहणार हे स्पष्ट केले. अखेरच्या पाच मिनिटांत पलटण संघाने राखीव खेळाडूंनाही खेळण्याची संधी देत चार खेळाडू बदलले. याचा फायदा घेताना परदीप नरवालने अव्वल चढाई करत तीन गुणांची कमाई केली आणि हाच काय तो बंगळुरु संघासाठीचा सामन्यातील सर्वोत्तम क्षण ठरला. गुणांची कमाई कायम राखत पलटण संघाने दोन मिनिट शिल्लक असताना गुणांचे अर्धशतक साजरे केले. आर्यवर्धन नवलेने शानदार उडी घेत एकाच चढाईत पाच गुणांची कमाई करुन आधीच खचलेल्या बंगळुरुच्या जखमेवर मीठ चोळले.

हे ही वाचा: Pro Kabaddi League: हरियाणा स्टीलर्सने केला प्लेऑफ मध्ये प्रवेश! बंगळुरू बुल्सकडून दमदार लढत, बघा Points Table

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pro Kabaddi (@prokabaddi)

हे ही वाचा: Border-Gavaskar Trophy: यशस्वी जैस्वालवर भडकला रोहित शर्मा, ओपनिंग स्टारला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम

आव्हान आले संपुष्टात 

आव्हान संपुष्टात आलेल्या बंगळुरु बुल्सविरुद्ध खेळताना पुणेरी पलटणच्या खेळाडूंना वर्चस्व राखण्यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागले नाही. बंगुळुरुच्या एकाही खेळाडूची देहबोली आपण सामना खेळतोय अशी नव्हती. घरच्या मैदानावर अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या पलटण संघाने या संधीचा पुरेपूर फायदा उठवला. पंकज मोहिते, आकाश शिंदे, मोहित गोयत यांनी आपल्या चढाया चोख केल्या आणि अमन, गैरव खत्रीने बचावाची बाजू तेवढ्याच ताकदीने सांभाळली. पूर्वार्धातच दोन लोण चढवत पुणेरी पलटणने आपले वर्चस्व राखले. मध्यंतराचा २६-७ असा गुणफलक पुणेरी पलटणचे वर्चस्व आणि विजय निश्चित करणारा होता. पूर्वार्धाच्या दुसऱ्या टप्प्यात बंगळुरु संघाला केवळ एका गुणाची कमाई करता आली. एकाही आघाडीवर बंगळुरुचे खेळाडू प्रयत्न करताना दिसून आले नाहीत.