'जसप्रीत बुमराहपेक्षा...', फक्त एक ODI खेळणाऱ्या पाकिस्तानच्या गोलंदाजाचा दावा, Host म्हणाला 'उगाच काहीही...'

पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज इहसानुल्ला (Ihsanullah) याने भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहसंबंधी (Jasprit Bumrah) धक्कादायक दावा केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 20, 2024, 01:05 PM IST
'जसप्रीत बुमराहपेक्षा...', फक्त एक ODI खेळणाऱ्या पाकिस्तानच्या गोलंदाजाचा दावा, Host म्हणाला 'उगाच काहीही...' title=

पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज इहसानुल्ला (Ihsanullah) याने भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहसंबंधी (Jasprit Bumrah) धक्कादायक दावा केला आहे. इहसानुल्लाने पाकिस्तान संघाकडून एक एकदिवसीय आणि चार टी-20 सामने खेळले आहेत. नसीम शाह जसप्रीत बुमराहपेक्षा चांगला गोलंदाज आहे असा दावा त्याने केला आहे. जसप्रीत बुमराह सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर असणाऱ्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी आहे. आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या यादीत बुमराह पहिल्या क्रमांकावर आहे. जसप्रीत बुमराहने सर्व प्रकारांमध्ये आपण सर्वोत्तम गोलंदाज असल्याचं सिद्ध केलं आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये त्याला 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' पुरस्काराने सन्मानितही करण्यात आलं होतं. दरम्यान, नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत इहसानुल्लाहने त्याचा पाकिस्तानचा सहकारी बुमराहच्या तुलनेत खूपच चांगला गोलंदाज आहे.

"जर तुम्ही नीट पाहिलं तर नसीम शाह जसप्रीत बुमरहापेक्षा चांगला गोलंदाज आहे," असं इहसानुल्लाह म्हणाला. यावेळी मुलाखत घेणाऱ्याने त्याच्या दाव्याला आव्हान देत नसीमच्या तुलनेत बुमराहची कामगिरी फार चांगली होती याकडे लक्ष वेधलं. पण इहसानुल्लाह आपल्या दाव्यावर ठाम होता. नसीमनेही टी-20 वर्ल्डकप 2022 मध्ये चांगली कामगिरी केल्याचं त्याने सांगितलं. 

"नसीम शाहदेखील 2022 टी-20 वर्ल्डकपमध्ये अशीच कामगिरी करत होता. अनेकदा असं होतं की एखादा खेळाडू वर्षभर चांगली कामगिरी करत नाही, त्यात काही मोठं नाही. पण नसीम शाह त्याच्यापेक्षा चांगला आहे," असं तो म्हणाला.

तत्पूर्वी, भारताचा कर्णधार रोहित शर्माने मंगळवारी जसप्रीत बुमराहची न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी उपकर्णधारपदी बढती झाली आहे. बांगलादेशविरोधातील मालिकेत रोहित शर्मा कर्णधार असताना, उप-कर्णधारपदी कोणीच नव्हतं. त्यामुळे बुमराहला बढती मिळाल्यानंतर सर्वजण आश्चर्यचकित झाले. 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बुमराहला कर्णधार केलं जाण्याची शक्यता असून, यामुळे हा निर्णय घेतला असावा अशी चर्चा आहे. “हे पाहा, बुमराह खूप क्रिकेट खेळला आहे. मी त्याच्यासोबत खूप क्रिकेट खेळलो आहे. त्याला खेळ चांगला समजतो. त्याच्याकडे चांगलं डोकं आहे. जेव्हा तुम्ही त्याच्याशी बोलता तेव्हा त्याला खेळ समजतो,” असं रोहित शर्माने पत्रकारांना सांगितलं. “त्याला कर्णधारपदाचा जास्त अनुभव नसल्याने मी फार काही सांगू शकत नाही. माझ्या माहितीनुसार तो एका कसोटी आणि दोन टी-20 सामन्यात कर्णधार होता,” असं तो पुढे म्हणाला.