'गांगुलीने आपला जॅक लावला आहे,' गौतम गंभीरच्या आरोपांना सौरव गांगुलीचं एका शब्दात उत्तर, म्हणाला....; खेळाडूचा खुलासा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर मनोज तिवारीने (Manoj Tiwary) खुलासा केला आहे की, त्यांच्यातील वादादरम्यान गौतम गंभीरने (Gautam Gambhir) सौरव गांगुलीचाही (Sourav Ganguly) अपमान केला होता.   

शिवराज यादव | Updated: Jan 24, 2025, 02:30 PM IST
'गांगुलीने आपला जॅक लावला आहे,' गौतम गंभीरच्या आरोपांना सौरव गांगुलीचं एका शब्दात उत्तर, म्हणाला....; खेळाडूचा खुलासा title=

गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि मनोज तिवारी (Manoj Tiwary) यांच्यातील वाद फार जुना आहे. 2015 मध्ये अरुण जेटली स्टेडियमवर (तत्कालीन फिरोजशाह कोटला) दिल्ली आणि बंगाल यांच्यातील रणजी ट्रॉफी सामन्यादरम्यान मैदानावर दोघे भिडले होते. भारत आणि कोलकाता नाईट रायडर्स संघातील हे माजी सहकारी जवळजवळ मैदानाच्या मध्यभागीच आमने-सामने आले होते आणि एकमेकाला सुनावलं  होतं. तेव्हापासून गंभीर आणि तिवारी यांच्यातील नातं फारसं मैत्रीपूर्ण राहिलेलं नाही. 10 वर्षांनंतरही मनोज तिवारी गौतम गंभीरला लक्ष्य करत आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघात एकत्र असताना भारताच्या मुख्य प्रशिक्षकाने त्याला कशी धमकी दिली होती याची आठवण त्याने सांगितली. 

पण अनेकांना माहिती नाही की, गौतम गंभीरने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीलाही लक्ष्य केलं होतं. आपल्याशी भांडताना गौतम गंभीरने सौरव गांगुलीच्या नावाचाही उल्लेख केला होता असं मनोज तिवारीने सांगितलं आहे. मनोज तिवारीचं गांगुलीशी चांगलं नातं आहे. त्याने गौतम गंभीर नेमकं काय म्हणाला होता आणि सौरव गांगुलीने कशाप्रकारे शांत राहून त्याला उत्तर दिलं होतं हे सांगितलं आहे. 

"जेव्हा तो सतत शिवीगाळ करत होता, तेव्हा सौरव गांगुली नुकताच क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालशी जोडला गेला होता. तो त्याच्याबद्दल वाईट बोलत होता. तो आपला जॅक लावून आला आहे, तूपण त्याच्या पाठीमागून आलास का? तू पण हे सगळं करुन पोहोचला आहेस. जेव्हा मी दादाला हे सगळं सांगितलं तेव्हा त्याने म्हटलं की ठीक आहे. त्याला सांगणं माझं कर्तव्य होतं. त्याला सतत राग येत असतो. त्यानंतर आम्ही बोलण्याचा किंवा भेटण्याचा काही संबंध आला नाही," असं मनोज तिवारीने लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. 

सामना संपायला अवघी 40 मिनिटं शिल्लक असताना तिवारी जाणूनबुजून खेळण्यास उशीर करत आहे असा गंभीरचा समज होता, त्यामुळे तो वाद झाला होता. गंभीरने यावरुन थेट शिवीगाळ सुरू केली, जी बंगालच्या फलंदाजाला पसंत पडली नाही. तिवारीने दावा केली आहे की, सामन्यानंतर गंभीरने त्याला थेट हाणामारीचं आव्हान दिले आणि परिस्थिती इतकी बिकट झाली की त्यांचे संबंध पुन्हा पूर्वीसारखे राहिले नाहीत.

"मी कधीही अशा शिव्या देताना ऐकले नाही. जर कोणी तुमच्या आईला शिवीगाळ केली तर तुम्ही ते सहन करू नये. मी शांतपणे शिवीगाळ सहन करू शकणारा माणूस नाही. मी त्याला विचारले, 'गौती भाई, तुम्ही असे का बोलत आहात?'. मग ओव्हर संपली. मग मी शांत झालो. तो म्हणाला, 'संध्याकाळी भेट, मी तुला मारतो'. मी म्हणालो, 'संध्याकाळ का? आता करूया.' सामना दिल्लीत होता. कोणताही खेळाडू माझ्याशी कधीही अशा प्रकारे बोलला नाही. उपस्थित असलेल्या सर्व माध्यमांनी त्याच्या तोंडून निघालेले सर्व शब्द ऐकले," असं तिवारीने सांगितलं.