बंगळुरू : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरूवारी होत असलेल्या चौथ्या वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यावर पावसाचे सावट आहे. येत्या २४ ते ४८ तासात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
गेल्या २४ तासात शहरातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. ५४ मिमी इतकी या पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे पुढील २४ ते ४८ तासात जोरदार पाऊस होणार असेल तर हा चौथा वनडे सामना रद्द होण्याची किंवा खेळात व्यत्यय येण्याची चिन्हे आहेत.
चिन्नास्वामी मैदानातील क्यूरेटर पिच कोरडी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. तशी या स्टेडियममध्ये मैदान कोरडे करण्यासाठी आधुनिक तंत्र उपलब्ध आहे. त्यामुळे पाऊस गेल्यावर लगेच सामना सुरू होऊ शकतो. दरम्यान, दोन्ही टीमला याआधी कोलकातामध्येही पावसाचा सामना करावा लागला होता. पावसामुळे दोन्ही टीमना इनडोअर सराव करावा लागला होता.
इंदोरमध्ये झालेल्या तिस-या वनडे सामन्याआधीही पाऊस झाला होता. पण याचा सामन्यावर काही प्रभाव पडला नाही. चेन्नईमध्येही पहिल्या वनडे सामन्याआधीही झालेल्या पावसाने दोन तास खेळात व्यत्यय आला होता. त्यानंतर बॅटींगसाठी मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियासाठी खेळ २१ ओव्हर्सचा करण्यात आला होता. टीम इंडियाने इंदोरमध्ये झालेल्या तिस-या वनडे सामन्यात पाच विकेटने ऑस्ट्रेलियाला मात दिली. त्यामुळे टीम इंडियाने ५ वनडे सामन्यांच्या सीरिजमध्ये ३.० ने आघाडी घेत सीरिज खिशात घातली आहे.