इंदापुरात एकाच कार्यक्रमाचे दोनदा उद्धाटन, राष्ट्रवादी पक्षातील श्रेयवाद शिगेला

इंदापुरात शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्या बसच्या उद्धाटनावरून श्रेय वादाची लढाई पाहायला मिळाली. 

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 23, 2025, 06:51 PM IST
इंदापुरात एकाच कार्यक्रमाचे दोनदा उद्धाटन, राष्ट्रवादी पक्षातील श्रेयवाद शिगेला

Pune News : इंदापूर बस आगाराकडे प्रवाशांच्या सेवेसाठी 10 नवीन बस दाखल झाल्या आहेत. या बसच्या उद्धाटनावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार या दोन्ही गटांमध्ये श्रेय वादाची लढाई पाहायला मिळाली. दुपारी साडेबारा वाजता शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी इंदापुरात दाखल झालेल्या नवीन बसेसचे उद्घाटन केलं तर एक वाजता दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते या नवीन बसेसचे पुन्हा एकदा उद्धाटन करण्यात आलं. यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या नवीन बसमधून प्रवास करण्याचा आनंद देखील घेतला. 

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्यामुळे इंदापूर बस आगाराकडे या 10 नवीन बस आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी केला आहे. तर क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आले काय किंवा अन्य कोणता मंत्री आला काय इंदापूर तालुक्याचा विकास होतोय, या सगळ्या गाड्या जरी नवीन आल्या तर काही वाईट नाही असा खोचक टोलाही महारुद्र पाटील यांनी दत्तात्रय भरणे यांना लगावला आहे. 

दत्तात्रय भरणे यांचं शरद पवार गटाला प्रत्युत्तर

महारुद्र पाटील यांच्या टीकेनंतर  दत्तात्रय भरणे यांनी शरद पवार गटाला प्रत्युत्तर दिलं. इंदापुरात दाखल झालेल्या नवीन बसवरून राजकारण करण्याची गरज नाही. तालुक्याचा आमदार मी आहे मंत्री मी आहे. त्यामुळे या बस कोणी मंजूर केल्या,  हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यामुळे मला त्या खोलात पडायचं नाही.  उद्घाटन करायचा कोणाला अधिकार आहे याबाबत मला कोणावरही टीका टिप्पणी करायची नाही असं प्रत्युत्तर दत्तात्रय भरणे यांनी शरद पवार गटाला दिलं. 

पुणे विभागाला एकूण 150 नवीन बस मिळणार आहेत. ज्यामधील 30 बस शनिवारी पुण्यात दाखल झाल्या. या बस बारामती आणि इंदापूर आगारासाठी देण्यात आल्या आहेत. या बसला प्रवाशांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. लांब पल्याच्या प्रवासासाठी देखील या बसचा वापर केला जाणार आहे.