R Ashwin On Celebrating Extravagantly: भारतीय संघाचा माजी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन हा निवृत्तीपासून चांगलाच चर्चेत आहे. मैदानावर आपल्या बोटांची जादू दाखवणारा हा खेळाडू मैदानाबाहेर बोलतानाही फारच स्मार्ट असल्याचं लक्षात येतं. अश्विन आजूबाजूला असताना त्याचं बोलणं नक्कीच सर्वाचं लक्ष वेधून घेतं. आपल्या बोलण्यामध्ये तो समोरच्यांना तासन् तास गुंतवून ठेवू शकतो. बरं तो क्रिकेटबद्दलच बोलत असो असंही नाही. कधीतरी एखादा विनोद, कधीतरी बोलता बोलता सांगितलेले किस्से असं सारं काही तो अगदी ओघात बोलून जातो. मात्र या साऱ्यामध्ये आपण खरंच कसे आहोत हे अश्विनने मुद्दा एका व्हिडीओमध्ये आता चाहत्यांसमोर मांडलं आहे.
अश्विनने आता अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याने जुलै महिन्यामध्येच एक भन्नाट व्हिडीओ रिलीज केलेला. इंग्लंडचा माजी कर्णधार मिचेल अथर्टोनने स्काय स्पोर्ट्सच्या पॉडकास्टमध्ये अश्विनला त्याच्या पुस्तकाबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळेस अश्विनने मला लोकांनी मैदानावरील क्रिकेटपटूबरोबर एक व्यक्ती म्हणून ओळखावं अशी माझी इच्छा असल्याचं म्हटलं आहे. यावेळेस बोलताना अश्विन हा फार गंभीर स्वरुपाचा क्रिकेटपटू असून तो विराट कोहली इतकं क्रिकेट एन्जॉय करत नाही असा एक गैरसमज असून तोच अश्विनने दूर केला.
"मी जसा कसा आहे त्यासाठी लोकांनी मला ओळखावं असं मला वाटतं. अनेकदा अश्विन विकेट घेतो आणि विराटच सगळीकडे धावताना दिसतो. तो फार उड्या मारत असतो त्यामुळेच अश्विन हा फार गंभीर क्रिकेटपटू आहे आणि विराटच क्रिकेटचा सगळा आनंद घेतो असं पाहाणाऱ्याला वाटतं. त्यामुळेच मला एकदा एकाने, तू कायम एवढा गंभीर का असतो? असा प्रश्न विचारलेला. या प्रश्नाला माझं उत्तर असं आहे की मी फार गांभीर चेहऱ्याने फिरणाऱ्या लोकांमधील एक नाही. मात्र माझ्या देशासाठी खेळता माझ्या हातात चेंडू असतो आणि मला देशासाठी कसोटी जिंकवून द्यायची असते तेव्हा माझ्या डोक्यात त्याचसंदर्भातील विचार सुरु असतात. मी त्या प्रोसेसमध्ये असतो, असं अश्विन म्हणाला.
अश्विनने एकूण 37 वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूला यापूर्वी हे जमलेलं नाही. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 11 वेळा मालिकावीर पुरस्कार पटकावला असून हा पराक्रम करणारा तो पहिलाच भारतीय आहे. मात्र आपण आपल्या करिअरमधील महत्त्वाच्या अचिव्हमेंट कधीच अती उत्साहात साजऱ्या केलेल्या नाहीत असंही अश्विन म्हणाला. एखादा माइलस्टोन गाठल्यानंतर मी कधीच माझ्या पत्नीला मैदानातून फ्लाइंग किस दिलेले नाहीत, असंही अश्विन म्हणाला.
"तुम्ही कधीच असं पाहिलं नसेल की, मी पाच विकेट्स घेतल्या आहेत आणि त्यानंतर पत्नीच्या दिशेने बघून हवेत चुंबनं दिली आहेत. ड्रेसिंग रुम किंवा हॉस्पीटॅलिटी बॉक्समध्ये बसलेल्या माझ्या पत्नीच्या दिशेने कधीच बॅटवरुन चुंबनं उडवलेली नाहीत," असं अश्विन म्हणाला. "याच कारणामुळे मी कसा आहे हे मला माझ्या पुस्तकाच्या माध्यमातून सांगायचं आहे," असं पुस्तक लिहिण्याचं कारण सांगताना अश्विनने म्हटलं.