'जर तुमचे सर्वोत्तम खेळाडूही....', रोहित, विराटचा उल्लेख करत सुनील गावसकर स्पष्टच बोलले, 'तुमचं नशीबही...'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) सध्या खराब फॉर्मचा सामना करत असल्याचं मत सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी मांडलं आहे. तसंच लोकांना याचा फारसा विचार करु नये असंही म्हटलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 4, 2024, 04:03 PM IST
'जर तुमचे सर्वोत्तम खेळाडूही....', रोहित, विराटचा उल्लेख करत सुनील गावसकर स्पष्टच बोलले, 'तुमचं नशीबही...' title=

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) सध्या खराब फॉर्मचा सामना करत असल्याचं मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी मांडलं आहे. तसंच लोकांना याचा फारसा विचार करु नये असंही म्हटलं आहे. न्यूझीलंविरोधातील कसोटी मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना एकही मोठी खेळी करता आली नाही. भारताने न्य़ूझीलंडविरोधातील मालिका 0-3 ने गमावली असून लाजिरवाणा पराभव झाला आहे. तिसऱ्या सामन्यात भारताला जिंकण्यासाठी 147 धावांची गरज असताना रोहित शर्मा, विराट कोहली संघाला विजयी करतील अशी खेळी करण्यास असमर्थ ठरले. न्यूझीलंडविरोधातील तीन सामन्यांच्या मालिकेत दोघेही कमनशिबी ठरले आणि यामुळे स्थिती आणखी वाईट झाली असं सुनील गावसकर म्हणाले आहेत. 

"तुमचे सर्वोत्तम खेळाडूही वाईट काळातून जातात. तिन्ही सामन्यात फलंदाजी करण्यासाठी अनुकूल खेळपट्टी नव्हती. येथे फलंदाजी करणं फार सोपं नव्हतं. यामध्ये फक्त बंगळुरुमधील दुसऱ्या डावातील खेळी वगळावी लागेल. कधीतरी तुम्हाला नशिबाची साथ लागते. जसं की तुम्ही पहिली चूक करता आणि चेंडू स्टम्पच्या जवळ जातो. कोणीतरी कॅच सोडतं, एलबीडब्ल्यूचा निर्णय तुमच्या बाजूने जातो. हे सगळं घडत असतं. पण जेव्हा तुमचा वाईट काळ सुरु असतो तेव्हा या सर्व गोष्टी तुमच्या विरोधात जातात. कोणीतरी सर्वोत्तम झेल घेतो, कोणीतरी सर्वोत्तम चेंडू टाकतं. मी याबाबत फार विचार करणार नाही," असं सुनील गावसकर म्हणाले आहे.

'न्यूझीलंड मालिकेआधी दुलीप ट्रॉफी खेळा', निवडकर्त्यांनी केली होती सूचना; रोहित, विराटने दिला होता स्पष्ट नकार

 

भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडविरोधातील कसोटी मालिकेआधी दुलीप ट्रॉफी खेळायला हवी होती असं मतही सुनील गावसकर यांनी व्यक्त केलं आहे. सराव करणं भारतीय संघासाठी फार महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले. "त्यांनी थोडा सराव करायला होता. हे नक्की फार मोठं अंतर होतं. आपण बांगलादेशचा पराभव केला असल्याने न्यूझीलंडविरोधात सहज विजय मिळवू असं वाटलं होतं". पुढे ते म्हणाले "पण नक्कीच न्यूझीलंड संघाकडे भारतात आणि आयपीएलमध्ये खेळाडूंहसह चांगलं आक्रमण होतं. त्यांना भारतीय खेळपट्टी कशी आहे याची कल्पना आहे".

"हे आता विसरुन जा इतकंच मला सांगायचं आहे. एक वाईट स्वप्न समजून हे विसरुन जा. ऑस्ट्रेलियावर लक्ष केंद्रीत करा. सराव करा आणि सलग तिसऱ्यांदा जिंकण्याचा हेतू मनात ठेवा. मग तुम्ही 1-0, 2-0,2-1 कसंही जिंका. यामुळे भारतीय प्रेक्षकांची नाराजीही दूर होईल," असं ते म्हणाले आहेत.