Team India : भारत आणि बांगलादेशदरम्यान येत्या 19 सप्टेंबरपासून दोन कसोटी आणि तीन टी20 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिकाही खेळवली जाणार आहे. त्याआधी टीम इंडियासाठी (Team India) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा विकेटटेकर गोलंदाज मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 पासून शमी टीम इंडियातून बाहेर आहे. वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान शमी दुखापतग्रस्त झाला होता. या वर्षाच्या सुरुवातीलाच त्याच्या पायावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या दुखापतीतून तो आता पूर्णपणे सावरला आहे. सराव शिबिरात शमीने जोरदार सरावही सुरु केला. शमी सध्या बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करतोय.
मोहम्मद शमीचा संघात समावेश
मोहम्मद शमीचा स्थानिक हंगामासाठी बंगालच्या 31 सदस्यीय खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धेत मोहम्मद शमी बंगाल संघाकडून खेळताना दिसणार आहे. 11 ऑक्टोबरला बंगाल आणि उत्तर प्रदेशदरम्यान रणजी सामना खेळवला जाणार आहे, त्यानंतर 18 ऑक्टोबरला बंगलाचा सामना बिहारशी होणार आहे. या दोन्ही सामन्यात शमी खेळण्याची शक्यता आहे.
टीम इंडियात कधी होणार कमबॅक?
स्थानिक क्रिकेटमधून मोहम्मद शमीला टीम इंडियात कमबॅक करायचं आहे. 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. तर 19 ऑक्टोबरपासून भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तीन कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. मोहम्मद शमी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत कमबॅक करण्याची शक्यता आहे. पण या मालिकेत शमी खेळू शकला नाही तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याच्या खेळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया दौर्यात भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
भावाबरोबर खेळणार
रणजी ट्ऱॉफीसाठी बंगालच्या 31 खेळाडूंची संभाव्य यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत मोहम्मद शमीबरोबर त्याचा भाऊ मोहम्मद कैफ याचाही समावेश करण्यात आला आहे. शमी रणजी ट्रॉफीत खेळण्यास तयार झाला तर दोन्ही भाऊ एकाच वेळी मैदानात दिसणार आहे. याशिवाय रिद्धिमान साहाचा देखील बंगाल संघात समावेश आहे. रणजी ट्रॉफीच्या गेल्या हंगामात बंगालला ग्रुपमध्येच पराभवाचा सामना करावा लागला होता. पण मोहम्मद शमी आणि मोहम्मद कैफ या हंगामात खेळल्यास बंगाल संघाला मोठी आशा आहे.