Champions Trophy 2025 PAK vs NZ : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. जवळपास 8 वर्षांनी आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीचे (Champions Trophy 2025) आयोजन करण्यात आले असून यातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानची टक्कर न्यूझीलंड सोबत होणार आहे. 2017 मध्ये टीम इंडियाचा पराभव करून पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले होते. पाकिस्तानमध्ये तब्बल 29 वर्षांनी आयसीसी टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी 1996 मध्ये पाकिस्तानकडे वनडे वर्ल्ड कपचं यजमानपद देण्यात आलं होतं.
यंदा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 8 संघ क्वालिफाय झाले असून यातील ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. तर ग्रुप बी मध्ये दक्षिण अफ्रीका, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान, इंग्लंड या संघांचा सहभाग आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नियमांनुसार ग्रुपमधील संघ एकमेकांसोबत प्रत्येकी एकदा सामना खेळेल. म्हणजे सेमी फायनलपूर्वी प्रत्येकी संघ तीन सामने खेळणार आहे. यात ग्रुपमध्ये टॉपर राहणारे दोन संघ सेमी फायनलमध्ये पोहोचतील. त्यामुळे टूर्नामेंटमधील एक पराभव सुद्धा सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता कमी करू शकतो. त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड हा पहिला सामना अतिशय महत्वाचा समजला जात आहे.
काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानला न्यूझीलंड विरुद्ध एका आठवड्यात दोनदा पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांना घरच्या मैदानावर ट्राएंगुलर सीरीजमध्ये न्यूझीलंड संघाने पहिल्या ग्रुप राउंडमध्ये पराभूत केलं आणि नंतर फायनलमध्येही त्यांचा पराभव केला होता. तेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफीतील आव्हान कायम ठेवण्यासाठी पहिल्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाला पराभूत करणं पाकिस्तानसाठी महत्वाचं असणार आहे.
हेही वाचा : भारत vs बांगलादेश सामन्यात कशी असणार दुबईची खेळपट्टी? गोलंदाज की फलंदाज कोणाचं वर्चस्व? पाहा पिच रिपोर्ट..
19 फेब्रुवारी रोजी होणार पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड हा सामना जिंकण्यास मोहम्मद रिझवानची टीम अपयशी ठरली तर पाकिस्तान अडचणीत येईल. अशात त्यांना भारत आणि बांगलादेश विरुद्ध होणारे उर्वरित दोन्ही सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील. 23 फेब्रुवारी रोजी भारत सोबत तर 27 फेब्रुवारी रोजी बांगलादेश सोबत त्यांना ग्रुप स्टेजचे दोन सामने खेळायचे आहेत. जर पाकिस्तान भारताविरुद्धचा सामना हरला तर ते थेट स्पर्धेतून बाहेर पडतील.
पाकिस्तान जर पहिल्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध पराभूत झाला तर भारताला सेमी फायनलमध्ये पोहोचणं सोपं होईल. तसेच भारताला 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेश आणि 23 फेब्रुवारी रोजी होणारा पाकिस्तान विरुद्धचा सामना सुद्धा जिंकावा लागेल. न्यूझीलंड विरुद्ध आयसीसी टूर्नामेंटमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड चांगला नाही. जर रोहित शर्माचा संघ न्यूझीलंड विरुद्ध पराभूत झाला तरी यापूर्वीचे दोन सामने जिंकल्यामुळे ते सेमी फायनलमध्ये पोहोचू शकतील. म्हणजेच पाकिस्तानचा न्यूझीलंड विरुद्धचा पराभव भारतासाठी फायद्याचा ठरेल.