New India Cooperative Bank Scam: न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील 122 कोटींच्या अपहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेचे पथक सर्व बाबींचा कसून तपास करीत आहे. पोलीस आता बँकेच्या प्रभादेवी आणि गोरेगाव येथील तिजो-यांचीच तपासणी करणार आहेत.
यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या लॉकरमध्ये इतकी मोठी रक्कम ठेवण्याइतपत तिजो-यांची क्षमता आहे का याची तपास पथक तपासणी करणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येतंय. बँकेतील १२२ कोटींच्या अपहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने आतापर्यंत दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यात बँकेचा जनरल मॅनेजर अॅण्ड अकाऊंटंट तसेच या गफल्याचा मुख्य मास्टरमाइंड हितेश मेहता आणि बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन यांचा समावेश आहे. या गुन्ह्यातील तिसरा आरोपी आणि सोलर पॅनलचा व्यावसायिक अरुणचिल्लम ऊर्फ अरुणभाई हा पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी बँकेचा माजी कार्यकारी अधिकारी अभिमन्यू बोमन तसेच सीए अभिजित देशमुख यांची चौकशी सुरू केली आहे.
न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेतील १२२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ला पत्र लिहून ऑडिट दरम्यान बँक लॉकरमधील रोख रक्कम प्रत्यक्ष तपासणी करण्याचा अधिकार बँक ऑडिटर्संना असतो का ह्याची विचारणा करणार आहे. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील १२२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) गेल्या पाच वर्षांपासून ऑडिट करणाऱ्या बँकेच्या अंतर्गत ऑडिटर्सना १२२ कोटी रुपये रोख रक्कम गायब असल्याचे का लक्षात आले नाही याची चौकशी करत आहेत. गुरुवारी, पोलिसांनी २०१९ ते २०२१ दरम्यान बँकेच्या खात्यांचे ऑडिट करणारे अभिजीत देशमुख यांचे जबाब नोंदवले.
न्यू इंडिया को-ऑप. बँकेला दोन आर्थिक वर्षांत ऑडिटसाठी 'ए' ग्रेड देणारे सीए अभिजित देशमुख गुरुवारी चौकशीला हजर झाले. त्यांनी बँकेला 'ए' ग्रेड ऑडिट रिपोर्ट कोणत्या आधारावर दिला याची चौकशी करण्यात आली. 'संजय राणे अँड असोसिएटस'चे देशमुख यांनीच न्यू इंडिया बँकेचे २०१९ ते २०२१ या दोन आर्थिक वर्षांचे ऑडिट केले होते. २०१९ पासून बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहताने गैरव्यवहार सुरू केला होता. त्यामुळे संशयाच्या घेण्यात अडकलेल्या देशमुख यांची चौकशी करून जबाब नोंदविण्यात आला आहे. अन्य ऑडिटरनाही समन्स बजावण्यात येणार आहेत. बँकेने सादर केलेल्या कागदपत्रांचा तपास सुरू आहे. तसेच माजी सीएओ अभिमन्यू भोअन यांच्याकडेही सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करून त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे.