Match Fixing प्रकरणी 3 क्रिकेटर्सला अटक; भारतीय कनेक्शन उघड, T20 वर्ल्डकप ठरला शेवटचा

3 Cricketers Arrested For Match Fixing Scandal: या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेला एक खेळाडू देशासाठी टी-20 वर्ल्ड कपचा सामनाही खेळलेला आहे. तो त्याचा अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना ठरला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 1, 2024, 08:27 AM IST
Match Fixing प्रकरणी 3 क्रिकेटर्सला अटक; भारतीय कनेक्शन उघड, T20 वर्ल्डकप ठरला शेवटचा title=
अनेक वर्षांपासून सुरु होता तपास (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य - रॉयटर्स)

3 Cricketers Arrested For Match Fixing Scandal: सध्या जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या मालिका खेळवल्या जात आहेत. ऑस्ट्रेलियात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची मालिका सुरु आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका मालिका सुरु आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंडदरम्यानही कसोटी सामना सुरु आहे. असं असतानाच क्रिकेट विश्वाला हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगने पुन्हा डोकं वर काढलं असून या प्रकरणात तीन क्रिकेटपटूंना थेट अटक करण्यात आली आहे. 

कोणाला करण्यात आली अटक?

क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग हा फार मोठा गुन्हा मानला जातो. मॅच फिक्सिंग प्रकरणामध्ये दोषी क्रिकेटपटूंना तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. असाच एक प्रकार आता समोर आला असून यामध्ये एक दोन नाही तर तीन खेळाडूंना पोलिसांनी अटक केली आहे. हा सारा प्रकार दक्षिण आफ्रिकेमध्ये घडला आहे. येथे 8 वर्षांपूर्वीच्या एका मॅच फिक्सिंग प्रकरणाचा भांडाफोड झाला आहे. यानंतरच या तीन खेळाडूंना अडक करण्यात आली आहे. थामी सोलेकिल (44) (Thami Tsolekile), लोनावो त्सोटोबे (40) (Lonwabo Tsotsobe) आणि  एथी मबालाती (43) (Ethy Mbhalati) अशी अटक करण्यात आलेल्या क्रिकेटपटूंची नावं आहेत. या खेळाडूंना अनुक्रमे 18, 28 आणि 29 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. या तिघांविरुद्ध 2015-16 च्या टी-20 रॅम स्लॅम चॅलेंज स्पर्धेदरम्यान मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप आहे. हे तिघेही सक्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले आहेत.

2016 पासून सुरु झाला तपास

डीपीसीआयअंतर्गत गंभीर भ्रष्टाचाराचा तपास करणाऱ्या तुकडीने ही अटकेची कारवाई केली आहे. एका जगाल्याने (गुप्त माहितीदाराने) दिलेल्या माहितीच्या आधारे 2016 पासून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला होता. दक्षिण आफ्रिकेतील भ्रष्टाचारविरोधी अधिकाऱ्यांना संशयास्पद हलचाली दिसून आल्याने त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. थामी सोलेकिल आणि लोनावो त्सोटोबेविरोधात भ्रष्टाचार नियंत्रण कायदा 2004 अंतर्गत 5 आरोप करण्यात आले आहेत. या दोन्ही खेळाडूंना प्रिटोरिया येथील विशेष आर्थिक गुन्हे न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. पुढील सुनावणी 26 जानेवारी 2025 रोजी होईल असं निश्चित करण्यात आलं आहे. 

भारत कनेक्शन समोर

या प्रकरणामध्ये गुलाब बोदीचंही नाव समोर आलं आहे. त्याच्यावर नजर ठेवतच हा तपास सुरु करण्यात आला. गुलाम बोदीने अनेक खेळाडूंशी संपर्क करुन घरगुती टी-20 सामन्यांच्या निकालावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला. भारतीय सट्टेबाजांच्या मदतीने तो या कटामध्ये सहभागी झाला होता. बोदीला 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2019 मध्ये त्याला आठ प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आल्यावर 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेली. 

शेवटचा सामना टी-20 वर्ल्डकपमधील

अटक करण्यात आलेल्या खेळाडूंपैकी लोनावो त्सोटोबे हा दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघाकडून खेळला आहे. त्याने 5 कसोटी आणि 61 एकदिवसीय सामन्यांबरोबर 23 टी-20 सामने खेळले आहेत. 2014 साली झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये लोनावो त्सोटोबे त्याचा शेवटचा सामना खेळला. तर अटक करण्यात आलेले अन्य दोन क्रिकेटपटू प्रथम वर्ग क्रिकेटपर्यंतच मर्यादित राहिले.