BCCI ची निवड समिती अखेर जाहीर; अध्यक्षपदी पुन्हा चेतन शर्मा तर 'या' दिग्गजांना संधी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नव्या निवड समितीची घोषणा केली आहे. चेतन शर्मा यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्याशिवाय माजी क्रिकेटपटूंच्या नावावरही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

Updated: Jan 7, 2023, 05:11 PM IST
BCCI ची निवड समिती अखेर जाहीर; अध्यक्षपदी पुन्हा चेतन शर्मा तर 'या' दिग्गजांना संधी  title=

BCCI : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नव्या निवड समितीची घोषणा केली आहे. निवड समितीसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर बीसीसीआयने (BCCI) भारतीय पुरुष संघाच्या निवड समितीची घोषणा केली आहे. सु. सुलक्षणा नाईक, श्री अशोक मल्होत्रा आणि श्री जतिन परांजपे यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने (CAC) अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीच्या सदस्यांची निवड केली आहे. चेतन शर्मा (Chetan Sharma) यांची पुन्हा एकदा निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्याशिवाय शिव सुंदर दास, सुब्रतो बॅनर्जी, सलील अंकोला आणि श्रीधरन सैराट यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला इंग्लंडकडून मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागल्यानंतर बीसीसीआयने कठोर पावलं उचलली होती. या पराभवानंतर बीसीआयने मोठा निर्णय घेत  चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती बरखास्त केली होती. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ निवड समिती बरखास्त करून नवीन निवड समितीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यानंतर आता नव्या निवड समितीची घोषणा केली आहे. पुन्हा एकदा बीसीसीआयने चेतन शर्मा यांच्यावर विश्वास टाकत त्यांची अध्यक्षपदी निवड केली आहे.

11 नावांमधून पाच जणांची निवड

बीसीसीआने यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, या समितीसाठी 11 जणांच्या नावे निवडण्यात आली होती. "योग्य विचारविनिमय आणि काळजीपूर्वक विचार केल्यानंतर, क्रिकेट सल्लागार समितीने वैयक्तिक मुलाखतीसाठी 11 जणांना निवडले होते. मुलाखतीच्या आधारावर समितीने पुरुष राष्ट्रीय निवड समितीसाठी चेतन शर्मा, शिव सुंदर दास, सुब्रतो बॅनर्जी, सलील अंकोला, श्रीधरन यांच्या नावाची शिफारस केली, असे बीसीसीआयने म्हटले आहे.