मुंबई : 'कॅप्टन कूल' एमएस धोनी आता 40 वर्षांचा झाला आहे, त्यामुळे तो सध्याच्या सीजननंतर किंवा पुढील वर्षापर्यंत आयपीएलमधून निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. 'यलो आर्मी'च्या चाहत्यांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, धोनीच्या जागी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार कोण असणार आहे?
महेंद्रसिंग धोनीच्या जागी चेन्नई सुपर किंग्जला लाँग टर्म कर्णधाराची गरज आहे. अशा परिस्थितीत ऋतुराज गायकवाड हा या पदासाठी सर्वात मोठा दावेदार मानला जातोय. कारण तो फक्त 24 वर्षांचा आहे आणि दीर्घकाळापर्यंत ही जबाबदारी पार पाडू शकतो.
ऋतुराज गायकवाडने चेन्नई सुपर किंग्जसाठी 2020 मध्ये आयपीएल पदार्पण केलं. आता तो या संघाचा विश्वासार्ह खेळाडू बनला आहे, अशी अपेक्षा आहे की पुढील वर्षी CSK त्याला कायम ठेवेल.
ऋतुराज गायकवाडने RCB विरुद्ध 168.33च्या स्ट्राईक रेटने 60 चेंडूत नाबाद 101 धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने 9 चौकार आणि 5 षटकार मारले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गायकवाडने 20व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून आपले शतक पूर्ण केलं. त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील हे पहिलं शतक होतं.
चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद मिळवताना ऋतुराज गायकवाडला टीम इंडियाचा मजबूत अष्टपैलू रवींद्र जडेजाकडून सर्वात मोठी स्पर्धा मिळेल. कारण जड्डूचा अनुभव गायकवाडपेक्षा जास्त आहे.