एक्स्प्रेस हायवेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो सावधान!

एक्स्प्रेस हायवेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो सावधान…. तुम्ही जर खाजगी अथवा स्वत:च्या वाहनाने रात्री- अपरात्री प्रवास करणार असाल तर जरा जपून… कारण रस्त्यात कुठल्याही क्षणी, कुठल्याही ठिकाणी तुमच्या वाहनावर सशस्त्र दरोडा पडू शकतो.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 17, 2014, 07:00 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
एक्स्प्रेस हायवेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो सावधान…. तुम्ही जर खाजगी अथवा स्वत:च्या वाहनाने रात्री- अपरात्री प्रवास करणार असाल तर जरा जपून… कारण रस्त्यात कुठल्याही क्षणी, कुठल्याही ठिकाणी तुमच्या वाहनावर सशस्त्र दरोडा पडू शकतो. तुम्हाला जबरी मारहाण होऊन तुमच्याकडील मुद्देमाल लुबाडला जाऊ शकतो शकतो… कारण मुंबईहून पुण्याकडे परतणाऱ्या एका कुटुंबानं नुकताच हा धक्कादायक अनुभव घेतलाय… त्यामुळे एक्स्प्रेस हायवे प्रवाशांसाठी कितपत सुरक्षित आहे, याविषयी प्रश्नचिन्ह उभं राहिलंय.
पुण्याच्या खराडीमध्ये राहणारं माली कुटुंब अजूनही धक्क्यातून सावरलेलं नाही. अमित माली यांच्या पत्नी रेसू आणि मुलगी वेदिका दरोडेखोरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या गाडीची अवस्थाही भयानक आहे. माली कुटुंब थायलंडला गेलं होतं. रविवारी रात्री ते मुंबईत परतले. त्यानंतर ते स्वत:च्या कारनं पुण्याच्या दिशेनं घरी निघाले. पहाटे पावणेदोनच्या दरम्यान कामशेतजवळच्या ताजे पेट्रोल पंपासमोर गाडी थांबवून अमित पाण्याची बाटली आणण्यासाठी खाली उतरले. पत्नी रेसू आणि मुलगी वेदिका गाडीमध्येच होते. एवढ्यात अंधारात दबा धरून बसलेल्या चौघांनी गाडीवर हल्ला चढवला. अमित गाडीजवळ पोचायच्या आत त्यांनी रेसू आणी वेदिकाला मारहाण करून त्यांच्याकडचा सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल लंपास केला. केवळ नशीब बलवत्तर म्हणून त्यांचे जीव वाचले.
रेसू यांचे पती आणि आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावले, तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते. आयआरबीचे कर्मचारी तसंच पोलीस पुढच्या १५-२० मिनिटांत घटनास्थळी पोचले, असं असलं तरी एक्स्प्रेस हायवेवरच्या सुरक्षा विषयक उपाय योजनांबद्दल अमित माली यांनी चिंता व्यक्त केलीय.
एक्स्प्रेस हायवेवर घडलेली ही अशा प्रकारची पहिलीच घटना नाही. यापूर्वीदेखील हायवेवर लुटमारीच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. तरीदेखील संबंधित यंत्रणा प्रवाशांना सुरक्षा पुरवण्यात अपयशी ठरत असल्याचं म्हणावं लागेल. अशा परिस्थितीत प्रवाशांनी स्वत:च स्वत:च्या सुरक्षेची काळजी घेणं आवश्यक आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.