पाच वर्षांनी पुन्हा राहुल गांधींचा नागपूर दौरा

आत्महत्याग्रस्त शेतक-याची पत्नी कलावती यांच्या भेटीमुळे राहुल गांधींचा पाच वर्षांपूर्वीचा विदर्भ दौरा चांगलाच गाजला होता. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी राहुल गांधी मंगळवारी एक दिवसाच्या विदर्भ दौ-यावर येतायत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 23, 2013, 05:46 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
आत्महत्याग्रस्त शेतक-याची पत्नी कलावती यांच्या भेटीमुळे राहुल गांधींचा पाच वर्षांपूर्वीचा विदर्भ दौरा चांगलाच गाजला होता. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी राहुल गांधी मंगळवारी एक दिवसाच्या विदर्भ दौ-यावर येतायत. राहुल यांचा हा दौरा केवळ पक्ष कार्यकर्त्यांसाठी आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल काय मार्गदर्शन करणार याकडं सगळ्यांच लक्ष लागलंय.
नागपूर शहराच्या जवळ असलेल्या सुराबर्डी मैदानावर काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या मेळाव्याला विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांसह मराठवाड्यातले नांदेड, परभणी, हिंगोली तसंच खान्देशातल्या नाशिक आणि मालेगावमधले प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत. सुमारे 2500 काँग्रेस प्रतिनिधींच्या या बैठकीत संघटनात्मक मुद्यांवर चर्चा होईल.

पुढच्या वर्षी होणा-या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा नारळ या मेळाव्याच्या निमित्ताने काँग्रेस फोडणार असे मानलं जातंय. दिवसभर होणा-या या बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
यापूर्वी जुलै 2008 मध्ये राहुल गांधी विदर्भाच्या दौ-यावर आले होते. आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांची त्यांनी घेतलेली भेट तेंव्हा चांगलीच गाजली होती. आता यंदाचा त्यांचा दौरा हा केवळ पक्षकार्यकर्त्यांसाठी आहे. मात्र या दौ-यात ते विदर्भातल्या कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.