मेट्रो-३ विरोधात शिवसेना रस्त्यावर

मराठीचा मुद्दा पुन्हा उचलत आणि स्थानिक रहिवाशांच्या घरांवर गंडांतर येईल, असे सांगत कुलाबा ते सीप्झदरम्यान उभारण्यात येणाऱ्या मेट्रो-३ च्या टप्प्याला स्थानिक रहिवाशांबरोबर शिवसेनेने विरोध केला आहे. त्यासाठी सेना रस्त्यावर उतरली.

Updated: Jan 29, 2015, 09:49 AM IST
मेट्रो-३ विरोधात शिवसेना रस्त्यावर title=

मुंबई : मराठीचा मुद्दा पुन्हा उचलत आणि स्थानिक रहिवाशांच्या घरांवर गंडांतर येईल, असे सांगत कुलाबा ते सीप्झदरम्यान उभारण्यात येणाऱ्या मेट्रो-३ च्या टप्प्याला स्थानिक रहिवाशांबरोबर शिवसेनेने विरोध केला आहे. त्यासाठी सेना रस्त्यावर उतरली.

'मेट्रो-३' मार्गातील इमारती हटलविल्या जाणार आहे, अशी माहिती रहिवाशांना मिळाल्यानंतर त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. या आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा देत रस्त्यावर उतरून बुधवारी आंदोलन केले. 

'रस्तारोको' आंदोलनामुळे अर्धा तास या परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. ठाकूरद्वारच्या नाक्यावर गिरगावकर आणि शिवसेनाकार्यकर्ते मोठय़ा संख्येने जमले. एमएमआरडीए हाय हाय', 'मेट्रो-३चा मार्ग बदला' अशा घोषणा यावेळी त्यांनी दिल्या. शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, माजी आमदार अरविंद नेरकर, नगरसेवक सुरेंद्र बागलकर, संपत ठाकूर आदींच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी रहिवाशांनी ठाकूरद्वार नाक्यावरच ठिय्या आंदोलन केले.

आंदोलनकर्त्यांशी पोलिसांनी चर्चा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 'मेट्रो-३' प्रकल्प होणे गरजेचे आहे, पण त्यासाठी या परिसरातील मूळ रहिवासी हद्दपार होता कामा नये. हा प्रकल्प कशा पद्धतीने राबविणार याची माहिती एमएमआरडीएने द्यावी. या प्रकल्पाआड येणाऱ्या इमारतींमधील रहिवाशांचे पूनर्वसन याच भागात व्हायला हवे किंवा 'मेट्रो-३' लोकवस्ती टाळून अन्य मार्गाने वळवावी. अन्यथा भाजप-शिवसेनेचे सरकार असले तरी शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा पांडुरंग सकपाळ यांनी दिला आहे.

दरम्यान, आमचे मूळ जागीच पूनर्वसन, केले जावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच याबाबत रहिवाशांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल, असे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून स्पष्ट करण्यात आले. हा प्रकल्प भूमिगत असून प्रवेश-निकास आणि अन्य काही सुविधांसाठी मोकळ्या जागांची आवश्यकता आहे, असे स्पष्टीकरण मेट्रोकडून देण्यात आले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.