मुंबई : मुंबईतल्या मरीन ड्राईव्हवर एलईडी दिवे कायम राहणार आहेत. मात्र पांढऱ्याऐवजी पिवळे दिवे लावण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. दिव्यावरुन उद्भवलेला वाद शमला असला तरी भाजपचे दिवे, शिवसेनेचा रंग अशी चर्चा रंगलेय.
एलईडीमुळे विजेची बचत होत असल्याचा दावा सरकारनं कोर्टात केला होता. तसंच सोडियम दिव्यांच्या कमी प्रकाशात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रण स्पष्ट दिसत नसल्याचंही सरकारनं कोर्टात नमूद केलं होतं. त्यामुळे सोडियमचे दिवे काढून एलईडी बसवल्याचं सरकारनं स्पष्ट केलं.
मात्र, क्वीन्स नेकलेसची रया आणि शान ही पिवळ्या दिव्यांतच आहे, ही हायकोर्टने केलेली सूचना योग्य असल्याचं सांगत पिवळे दिवे बसवण्याचं आश्वासन सरकारनं दिलंय.
न्यायालयाच्या या आदेशानंतर या एलईडी दिव्यांचा पुरवठा करणार्या एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिस कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका केली. एलईडी दिव्यांच्या रंगाबाबत आक्षेप असेल तर एलईडीचे पिवळे दिवे उपलब्ध आहेत. आम्ही क्वीन नेकलेसची रया जाणार नाही याची काळजी घेऊ. पिवळे दिवे लावण्याची परवानगी द्या अशी विनंती न्यायालयाला केली.
न्यायालयाने ही विनंती मान्य केली. दिवे कोणते लावावेत यावर आमचा आक्षेप नाही, परंतु पूर्वीच्या दिव्याने जी शान येत होती ती कायम राखली गेली पाहिजे एवढेच आमचे म्हणणे आहे. नवीन दिवे तातडीने लावा असा आदेशच खंडपीठाने दिला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.