पिंपरी-चिंचवड : राज्यावर दुष्काळाचं गंभीर सावट आहे. अर्ध्याहून अधिक महाराष्ट्र तहानलेला आहे. त्याची झळ अनेक शहरांना बसलेली नाही. पण अनेकांच्या संवेदना जाग्या असल्यानं पाणी आहे म्हणून त्याचा अपव्यय करत नाहीत. पिंपरी मधली सिटी प्राईड शाळा अशीच संवेदना जपतेय. पाणी वाचवण्यासाठी ही शाळा अनोखा उपक्रम राबवतेय.
पिंपरी चिंचवड च्या निगडी प्राधिकरण मधली सिटी प्राईड शाळा. इथे शाळेनं पाणी बचतीचा अभिनव उपक्रम सुरु केलाय. इथे शाळा सुटल्यानंतर वॉटरबॅगमध्ये उरलेले पाणी विद्यार्थी एका पिंपात जमा करतात.
जमा झालेलं पाणी शाळेच्या परिसरातील रोपांना घातलं जातं. तसंच, त्या पाण्याद्वारे परिसराची स्वच्छताही केली जाते. हा अनुकरणीय उपक्रम राबवून पिंपरी-चिंचवडच्या निगडी प्राधिकरण भागातील सिटी प्राईड स्कूलन अन्य शाळांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना दिलेल्या पाणीबचतीच्या मंत्रामुळे दर वर्षी सुमारे एक लाख लिटर पाण्याची बचत होत आहे. गेली तीन वर्ष हा उपक्रम शाळेत राबवला जात आहे. सिटी प्राईड शाळेत नर्सरी ते दहावीपर्यंत सुमारे ७०० विद्यार्थी शिक्षण घेतात. बहुसंख्य विद्यार्थी शाळेत येताना वॉटरबॅग किंवा बाटल्यांमधून पाणी आणतात.
शाळा सुटल्यानंतर घरी जाताना किंवा घरी गेल्यावर हे पाणी विद्यार्थी ओतून देतात. यामुळे पाणी वाया जाते. हे पाणी फेकून न देता शाळेतील बागेसाठी आणि साफसफाईसाठी वापरण्याची योजना आखण्यात आली.