पुणे : एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी अखेर संप मागे घेतलाय. तब्बल १३९ दिवसांनंतर विद्यार्थ्यांनी संप मागे घेतलाय. मात्र गजेंद्र चौहानांच्या नियुक्तीविरोधात लोकशाही मार्गानं आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केलाय. लढा देऊन केंद्र सरकार काहीही तोडगा काढत नसल्याचे पाहून एफटीआयआय विद्यार्थ्यांनी आपला संप गुंडाळलाय. मात्र, एफटीआयआय अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला विरोध कायम आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केलेय.
केंद्र सरकारसोबत चर्चा झाली. मात्र, केंद्र याबाबत उदासिन असल्याचे दिसून आले. या चर्चेतून काहीच निष्पन्न होत नसल्याने फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी आपला बेमुदत संप मागे घेतलाय. सरकारनं विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. सरकार त्यात अपयशी झाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषदेत केला. तर विद्यार्थ्यांच्या या निर्णयाचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड आणि एफटीआयआयचे संचालक गजेंद्र चौहान यांनी स्वागत केलंय.
गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात त्याचबरोबर इतर मागण्यांसाठी सुरू असलेला लढा यापुढेही कायम राहिल, असे आंदोलक विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलेय. संस्थेच्या शैक्षणिक कामकाजात उपस्थित राहण्याचेही विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलेय.
अभिनेते गजेंद्र चौहान यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी संस्थेतील विद्यार्थ्यांनी बेमुदत संप सुरू केला होता. त्यानंतर साखळी उपोषणही सुरू करण्यात आले होते. विद्यार्थी आणि सरकारी प्रतिनिधी यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. आंदोलक विद्यार्थी व केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये गेल्या आठवड्यात झालेली चर्चा झाली मात्र, तोडग्याबाबत काहीही स्पष्ट झाले नाही.
आता बस्स झाले. यापुढे सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीशी चर्चा करणार नसल्याचे आंदोलक विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.