औरंगाबाद : 20 वर्षीय पलाशचा इराणमध्ये अपघाती मृत्यू झालाय. मर्चंट नेव्हीमध्ये काम करणारा पलाशचा जहाज बुडाल्यामुळे मृत्यू झाल्याचं त्याच्या कुटुंबीयांना कळवण्यात आलंय. मात्र त्याचा मृतदेह कधी मिळणार या बाबत काहीही कळत नसल्यानं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
पलाशच्या मातेच्या अश्रूंचा बांध फुटलाय. म्हातारपणी आधार असलेल्या लेकाच्या मृत्यूच्या बातमीनं या माऊलीवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. औरंगाबादचा 20 वर्षीय पलाश बलसेटवार 2015 साली एका खाजगी कंपनीद्वारे इराणमध्ये नोकरीवर रुजू झाला. मात्र 15 मार्चला पलाशच्या भावाचा एक एसएमएस आला आणि सारेच हादरले.
इराणच्या बुशरपोर्ट या ठिकाणी जहाज बुडाल्यानं त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचा हा मेसेज होता. त्यानंतर मात्र पलाशच्या मृतदेहाचा थांगपत्ता लागत नाही. मुंबईतली एजन्सी, इराणचा भारतातील दूतावासाशी संपर्क साधल्यानंतरही पलाशचा मृतदेह शोधण्यात यश आलेलं नाही. सुट्ट्या सुरु असल्याचं कारण देत 15 दिवस मृतदेह मिळणार नसल्याचं बलसेटवार कुटुंबीयांना सांगण्यात आलंय.