पाटणा : बिहारच्या जहानाबादमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. पोलिसांसमोरच एका महिलेला विवस्त्र करुन मारहाण करण्यात आली.
मारहाण करण्यात आलेल्या महिलेवर अपहरणात सहभागी झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. 'झी मीडिया'ने यासंदर्भात वृत्त दाखवले होते. त्यानंतर एसएसपीकडून याप्रकरणात कारवाईचं आश्वासन देण्यात आले आहे.
रात्री दीड वाजता काही लोक पिडीत महिलेच्या घरात घुसले. यावेळी त्यांनी प्रथम महिलेच्या घराची तोडफोड केली. त्यानंतर तिला ओढत बाहेर फरफटत आणले. या महिलेला विवस्त्र करण्यात आले. तिला लाथा-बुक्यांनी मारहाण करण्यात आली.
हा सर्व प्रकार तिच्या घरासमोरच सुरू होता. यावेळी पोलीस आणि काही लोकांनी बघ्याची भूमिका घेतली. पोलिसांनी हा प्रकार रोखण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. ज्या लोकांनी तिला मारहाण केली त्या लोकांनी अपहणात सहभागी असल्याचा आरोप केलाय. या मारहाणीत जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेचा निषेध जहानाबादचे खासदार अरुण कुमार यांनी केला आहे. जेडीयूचे प्रवक्ते राजीव रंजन यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. यामधील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जेडीयूने केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.