www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
वलसाड जिल्ह्यातील सिल्धवा गावातील आश्रमशाळेत शिक्षिकेच्या मदतीनं एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण झाल्याचं प्रकरण उघडकीस आलंय. या प्रकरणात आश्रमशाळेच्या प्राचार्यासह एका शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली आहे.
या दोघांना कोर्टानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सिल्धवा गावातील आश्रमशाळेत इयत्ता सातवीत शिकणाऱ्या बारा वर्षीय आदिवासी विद्यार्थिनीनं तिच्यावर झालेल्या अत्याचाराची वाचा फोडताच वलसाड जिल्ह्यातील सिल्धवा गावच्या महिला सरपंचांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. त्यानंतर कपरादा पोलिसांनी आश्रमशाळेच्या ४६ वर्षीय प्राचार्य आणि संबंधित शिक्षिकेला अटक केली. पोलिसांनी आरोपींविरोधात बलात्कार आणि लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आश्रमशाळेतील ललिता देसाई या शिक्षिकेच्या मदतीनं प्राचार्य किरण कोली पटेल हा विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण करीत होता. गेल्या गुरुवारी या शिक्षिकेनं आदिवासी अल्पवयीन मुलीला पटेलच्या कक्षात सोडलं होतं. गेल्या दोन महिन्यांपासून प्राचार्याच्या संशयास्पद हालचालींवर ग्रामस्थ पाळत ठेवून होते. त्यानंतर या प्राचार्याला पकडल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं.
या विद्यार्थिनीचं चार ते पाच वेळा लैंगिक शोषण झाल्याची तक्रार एका ग्रामस्थानं केलीय. आरोपींना चार दिवसांची कोठडी सिल्धवा आश्रमशाळेचे प्राचार्य आणि शिक्षिकेला पोलिसांनी कपरादा इथल्या कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.