अहमदाबाद : लोकांना विश्वासात घेऊन त्यांना गंडा घालणाऱ्या एका तरुणाला गुजरातमध्ये अटक करण्यात आलीय.
उल्लेखनीय म्हणजे, 'रिलायन्स'चे संस्थापक धिरुभाई अंबानी यांना आपला आदर्श मानणाऱ्या या तरुणानं त्यांच्या नावाचा टॅटू आपल्या मनगटावर गोंदवलाय.
शेकडो लोकांना लॉटरी स्कीममधून गंडा घालणाऱ्या या तरुणाचं नाव राजू मेवाडा आहे. गुजरातच्या सीआयडी विभागानं त्याला अटक केलीय. 'जय खोडीयार मित्र मंडळ' नावाच्या स्कीमनं त्यानं अनेकांना गंडा घातल्याचं उघडकीस आलंय. या मंडळाच्या जवळपास २०५ शाखा गुजरातमध्ये कार्यरत असल्याचं समजतंय.
शिकण्यासाठी पैसे नव्हते म्हणून एकेकाळी रिक्षा ड्रायव्हर म्हणून काम करत असलेल्या राजूला कोणत्याही परिस्थितीत श्रीमंत व्हायचं होतं. त्यानंतर त्यानं एक आइसस्क्रीम पार्लरही सुरू केलं होतं. २००६ मध्ये राजूनं लकी ड्रॉ स्कीम सुरू केली होती. विजेत्यांना मोबाईल, बाईक देण्याचं स्वप्न दाखवत त्यानं बक्कळ पैसा कमावला.
त्यानंतर त्यानं विजेत्यांना कार देण्याचं स्वप्न दाखवलं.. यातच त्याला तोटा झाला.... आणि त्यानं आपलं लॉटरीचं दुकान बंद केलं. एव्हाना त्यानं लोकांकड़ून बराच पैसा उकळला होता. यामुळे, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.