निवडणुकीतील पराभवाचा बदला - मुलीवर बलात्कार

अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. ग्राम पंचायत निवडणुकीत एका महिलेकडून पराभव झाल्याने, एका संतप्त झालेल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने तिच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. 

Updated: Dec 28, 2015, 04:56 PM IST
निवडणुकीतील पराभवाचा बदला - मुलीवर बलात्कार title=

मिर्झापूर : अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. ग्राम पंचायत निवडणुकीत एका महिलेकडून पराभव झाल्याने, एका संतप्त झालेल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने तिच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. 

मिर्झापूर जिल्ह्यातील ब्लॉक डेव्हल्पमेंट काउंसिल (बी़डीएस) निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महिलेकडून एका व्यक्तीचा पराभव झाला. कोणत्याही निवडणुकीत एकाचा विजय तर दुसऱ्याचा पराभव हा ठरलेला आहे. 

मात्र एका महिलेकडून पराभव पत्करावा लागल्याने सहन न झाल्याने पराभवाचा वचपा काढण्यासाठी पराभूत उमेदवाराने त्याच्या साथीदारासोबत महिलेच्या अकरावीत शिकणाऱ्या मुलीला घरातून उचलून जवळच्या शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. 

मुलीने घडलेला सर्व प्रकार आईला सांगताच तिच्या आईने पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली. परंतु पोलिसांनी एफआयर दाखल न करताच कारवाईचे तोंडी आश्वासन देऊन तक्रारकर्त्यांना माघारी धा़डले. 

बुधवारी रात्री घटना घडूनही पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला न केल्याने शुक्रवारी मुलीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला असून बलात्कारसारख्या गंभीर प्रश्नांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई का केली नाही, याचा तपास करण्यात येईल ,तसेच दोषी आढळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मिर्झापूरचे पोलीस अधीक्षक अरविंद सेन यांनी दिली.  

बलात्कार पीडित मुलीने आत्महत्या करताच खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी पप्पू बाहेलिया आणि बिंदू बाहेलिया दोघांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली.