www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचा दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर अपमान झालाय. मनोहर जोशी व्यासपिठावर आले आणि त्यांना या अपमानाला सामोरं जात व्यासपीठ सोडावं लागलं. पण प्रश्न असा आहे की मनोहर जोशींचा अपमान होत असताना शिवसेना ज्येष्ठ नेते तसंच पक्षप्रमुख गप्प का बसले? शिवसेनेतल्या नव्या अधोगतीचीच ही नांदी म्हणायची का?
दसरा मेळाव्यासाठी मनोर जोशी व्यासपीठावर आले. शिवसेना पक्षप्रमुखांना अभिवादन करत ते स्थानापन्न झाले. मात्र त्याचवेळी मनोहर जोशींविरोधात शिवसैनिकांत तुफान घोषणाबाजी सुरू झाली. मनोहर जोशींवर शिव्यांचा वर्षावर करण्यात आला. अखेरीस जोशींनी व्यासपीठ सोडलं..
काय म्हणायचे या प्रकारास? जोशींनी दिलेली मुलाखत आणि अलीकडच्या काळातली त्यांची वक्तव्य त्यांना भोवली असा एकूण निष्कर्ष यातून काढायचा का? शिवसेना कोणत्या दिशेला चाललीय असा प्रश्न या निमित्ताने पडतोय. मनोहर जोशींचा अपमान होण्याची वेळ दसरा मेळवाव्याच यावी याला काय म्हणावं? एकीकडे जोशींचं चुकलं म्हणावे तर मग रामदास कदम का बरं बोलले नाहीत? पक्षाविरूद्ध असे नाराजीचे स्वर उमटू लागले तर सामान्य कार्यकर्त्यांकडून अशी घेषणाबाजी स्वाभाविक म्हणायला हवे. पण मग भाजपमध्ये सुद्धा असे स्वर उमटले तेव्हा टीका करणा-यांना अशी वागणूक मिळाली का? उलट मोदींनी जाऊन अडवाणींचे पायच धरले. त्यांना जाऊन समजावले. जोशींनी खुप केले आणि त्यांना शिवसेनेनेही खुप दिले हे मान्य केले तरी जिथे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तिथे ही वेळ त्यांच्यावर का यावी? यास जुन्या नेत्यांची अधोगती म्हणावी की नव्या पक्षनेतृत्वाची प्रगती, पक्ष शिस्तही महत्त्वाचीच. नाराजीचे स्वर एका शिस्तबद्ध पक्षात कशा रितीने उमटावेत याचे काही संकेत आहेत. त्यांच्याकडेही अनेकांनी विरोधाचे स्वर लावलेच की, पण त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांवर कधी पक्षात ही वेळ आली नाही. म्हणजेच कमळाबाईकडून शिकण्यासारखे काहीच नाही का?
काळ बदलला की पंत पडतात आणि राव चढतात. पण पंतास ऐसे जेरबंद करावे यात कोणता मुलुख मारीला. यात पक्षाच्या प्रतिमेचे काय झाले? जुनी लढाऊ शिवसेना दिसली की एका ज्येष्ठ नेत्याचा मुखभंग झाला.
आज जर बाळासाहेब असते तर टीका किंवा वक्तव्य करण्याची वेळ जोशींवर आली असती का? जोशींनी अशी हिंमत केली असती का? क्षणभर हे मान्यच की जोशी चुकलेच पण त्यांना अशी वागणूक ?
शेवटी काहीही असो गेल्या ४८ वर्षात शिवाजी पार्कवर जे झाले नाही ते या दस-याला घडले. आणि तेही बाळासाहेब गेल्यावर एका वर्षात घडले. त्यामुळे मनोहर जोशींना हाय हाय आणि रामदास कदम आदी नेत्यांची भाषणे झाली नाहीत हेच जास्त लक्षात राहीले.. पहिल्यांदाच असे घडले की शिवसेना पक्षप्रमुख काय बोलले यापेक्षा कोणाचे हाय हाय झाले आणि कोणाची भाषणे झाली नाहीत याचीच बातमी झाली. या बेबंदशाहीला उद्धव ठाकरे कसा लगाम लावतात हे लवकरच दिसेल...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.