www.24taas.com, झी मीडिया, पुणे
ऑस्ट्रेलियाने विजयादशमीच्या मुहूर्तावर सीमोल्लंघन करत टीम इंडियाचा पुण्यात झालेल्या सीरिजच्या पहिल्या वन-डेत ७२ रन्सनं पराभव करून टी-२०मध्ये झालेल्या पराभवाची परतफेड केली. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यापुढे भारतीय बॅट्समन्सनी पत्करलेल्या हाराकीरिमुळे टीम इंडियाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं.
संक्रमणावस्थेतून जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमने नंबर वन वन-डे टीम अशी ओळख असणाऱ्या धोनी सेनेला पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या वन-डेत ७२ रन्सने पराभवाचा धक्का देत सीमोल्लंघन केलं. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने कॅप्टन जॉर्ज बेली आणि ओपनिंग बॅट्समन ऍरोन फिंचची धमाकेदार हाफ सेंच्युरी... तसंच ग्लेन मॅक्सवेल आणि जेम्स फॉल्कनर यांनी केलेल्या हाणामारीमुळे तीनशे पारचा टप्पा गाठत भारतापुढे विजयासाठी ३०५ रन्सचं टार्गेट ठेवलं.
भारतातर्फे आर. अश्विन आणि युवराज सिंगने प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. तर विनय कुमार, ईशांत शर्मा आणि जाडेजाच्या खात्यात १-१ विकेट आली. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची अडखळती सुरूवात झाली. ६.२ ओव्हर्समध्ये टीमचे २६ रन्स झाले असताना शिखर धवन अवघे ७ रन्स काढून फॉल्कनरच्या बॉलिंगवर आऊट झाला. त्यानंतर आलेला विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टीमची इनिंग सांभाळली. मात्र, वैयक्तिक ४२ रन्सवर रोहित आणि ६१ रन्स काढून विराट कोहली पॅव्हिलियनमध्ये परतल्यानंतर टीम इंडियाच्या बॅट्समन्सनी ऑसी बॉलिंगपुढे गुडघे टेकायला सुरूवात केली. युवराज सिंग, कॅप्टन धोनी आणि जाडेजा स्वस्तात आऊट झाले आणि भारताचा पराभव स्पष्ट झाला. अखेरच्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर भुवनेश्वर आऊट झाला आणि भारताच्या इनिंगला २३२ रन्सवर फुलस्टॉप लागला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.