झीनत अमानचा नवा नवरा शिवसैनिक?

सत्तरीच्या दशकातील अभिनेत्री झीनत अमान हिच्या लग्नाबद्दलच्या बातम्या सध्या येत आहेत. अखेर झीनत अमानचा नवरा कोण या प्रश्नावरून पडदा उठला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 6, 2013, 05:10 PM IST

www.24taas.com, मुंबई
सत्तरीच्या दशकातील अभिनेत्री झीनत अमान हिच्या लग्नाबद्दलच्या बातम्या सध्या येत आहेत. अखेर झीनत अमानचा नवरा कोण या प्रश्नावरून पडदा उठला आहे. झीनत अमानचा नवरा तिच्यापेक्षा २४ वर्षांनी लहान असून झीनत अमान ६० वर्षांची तर तो ३६ वर्षांचा आहे. त्याचं नाव सरफराज अहमद असून तो बिझनेसमन आहे. तसंच तो शिवसेना नेताही आहे.
आपण लवकरच लग्न करणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच झीनत अमानने सांगितलं होतं. पण, काही जणांच्या मते तिने ६ महिन्यांपूर्वीच गुपचुप लग्न केले आहे. दिल्लीमधील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये त्यांनी आधीच लग्न केलं असल्याची माहिती दिली जात आहे. मात्र, या बातमीमध्ये कितपत तथ्य आहे, हे समजलेलं नाही. लग्नानंतर झीनत अमान आपल्या नवऱ्यासोबत बांद्र्याला माऊंट मेरी जवळील एका प्रशस्त अपार्टमेंटमध्ये राहात असल्याचं सांगण्यात येत आहे.

लग्नामुळे आपण पुन्हा तरुण झाल्याचं झीनत अमाननं म्हटलं आहे. यापूर्वी झीनत अमानचं मजहर खानशी लग्न झालं होतं. पण, नवरा व सासरची माणसं तिला मारहाण करत असल्याचं लवकरच समोर आलं. हे लग्न तितकंसं यशस्वी ठरू शकलं नाही. त्यानंतर झीनत अमानचं अभिनेता संजय खानशी प्रेमप्रकरण होतं. झीनत अमानला दोन मुलं आहेत.