अमुलचे दूध महाराष्ट्रात येऊ देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आता सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत.

Updated: Jul 16, 2018, 07:41 PM IST
अमुलचे दूध महाराष्ट्रात येऊ देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा title=

मुंबई: दूध दरवाढ आंदोलनादरम्यान अमूलने महाराष्ट्रात दूध पुरवठा केल्यास त्यांचे दुधाचे ट्रक अडवले जातील, असा  इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. या आंदोलनाला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. 

दरम्यान, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आता सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी राजू शेट्टींशी फोनवरून चर्चा केल्याचे समजते. 

तत्पूर्वी आज राजू शेट्टी यांनी सरकारने चर्चेचे निमंत्रण दिल्याचे वृत्त फेटाळून लावले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. दूध दरवाढीच्या मुद्द्यावर चर्चेला तयार आहोत. पण, ज्यांना ही चर्चा करण्याचे अधिकार आहेत अशांसोबतच चर्चा केली जाईल. या चर्चेत अधिकार नसलेल्या लुंग्यासुंग्यांची लूडबूड नको, असेही शेट्टी यांनी सांगितले.