निराशाजनक बातमी! 26 जानेवारीप्रमाणे 2025 मध्ये 'या' हक्काच्या सुट्ट्याही रविवारीच आल्यात

Public Holidays On Sunday: यंदाच्या वर्षी केवळ 26 जानेवारी नाही तर कर्मचाऱ्यांच्या अन्य तीन हक्काच्या सुट्ट्याही रविवारी आल्या आहेत. हे दिवस कोणते आहेत पाहूयात संपूर्ण यादी

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 26, 2025, 10:00 AM IST
निराशाजनक बातमी! 26 जानेवारीप्रमाणे 2025 मध्ये 'या' हक्काच्या सुट्ट्याही रविवारीच आल्यात title=
बऱ्याच सुट्ट्या रविवारी आल्या आहेत (प्रातिनिधिक फोटो)

Public Holidays On Sunday: आज देशभरामध्ये प्रजासत्ताक दिन (Republic Day 2025) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अगदी दिल्लीतील कर्तव्यपथापासून ते खेडेगावांमधील शाळांमध्येही ध्वजारोहण करुन हा राष्ट्रीय सण साजरा केला जात आहे. मात्र त्याचवेळी दुसरीकडे यंदा 26 जानेवारी (26 January) रविवारी आल्याने एक हक्काची सुट्टी गेल्याची भावना सोशल मीडियावरुन व्यक्त केली जात आहे. सामान्यपणे आठवड्यातील मधल्या वारी 26 जानेवारी असेल तर राष्ट्रीय सण म्हणून या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. मात्र यंदा प्रजासत्ताक दिन रविवारी आल्याने एका हक्काच्या सुट्टीला कात्री लागल्याबद्दल अनेकांनी खंत व्यक्त केली आहे. मात्र ही केवळ वर्षाची सुरुवात असून यंदा वर्षभरामध्ये अशा अनेक हक्काच्या सुट्ट्या रविवारी आल्याचं दिसत आहे. या सुट्ट्या कोणत्या आणि कधीकधी अशाप्रकारेच सार्वजनिक सुट्ट्या रविवारी आणि शनिवारी आल्यात पाहूयात...

राज्य सरकारनेच जाहीर केली आहे सुट्ट्यांची यादी

महाराष्ट्रामध्ये 4 डिसेंबर 2024 रोजी 2025 च्या सार्वजनिक सुट्ट्या कशा असतील यासंदर्भातील अधिसूचना जारी केली होती. राज्य सरकारने 24 सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. या सुट्ट्या सरकारी कार्यालयांबरोबरच सार्वजनिक उपक्रम क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही जागू असतील. महानगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीशीसंबंधित कामगारांनाही या 24 सुट्ट्यांचा लाभ मिळणार आहे. मात्र या सुट्टयांपैकी स्वातंत्र्य दिनाप्रमाणेच अन्य तीन सुट्ट्या रविवारी येणार आहेत. तर एक सुट्टी शनिवारी येत असल्याने पाच दिवस काम करणाऱ्यांना एकूण चार सुट्ट्यांचा फटका बसला आहे.

रविवारी येणाऱ्या सुट्ट्या कोणत्या

26 जानेवारीप्रमाणेच मार्च महिन्यामध्ये 30 तारखेला गुढीपाडव्याची सुट्टीही रविवारीच आली आहे. या शिवाय त्याच्या पुढचा रविवार म्हणजेच राम नवमीही (6 एप्रिल) रविवारीच आली आहे. त्यानंतर जुलै महिन्यामध्ये 6 तारखेला येणारी मोहरमची सुट्टीही रविवारीच आली आहे. म्हणजेच 30 मार्च, 6 एप्रिल आणि 6 जुलैची सुट्टी रविवारी आली आहे.

शनिवारी आणि सोमवारी आलेल्या सुट्ट्या कोणत्या?

7 जून रोजी बकरी ईदची सुट्टी आहे. मात्र ही सुट्टी शनिवारी आली आहे. तसेच यंदाच्या वर्षी रविवारला लागूनही काही सार्वजनिक सुट्ट्या आहेत. ज्यामध्ये 31 मार्च (रमजान-ईद), 14 एप्रिल (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती), बुद्ध पौर्णिमा (12 मे) या सुट्ट्या सोमवारी आल्या आहेत. 

लाँग विकेंड देणाऱ्या सुट्ट्या

सोमवारप्रमाणेच यंदाच्या वर्षी शुक्रवारीही बऱ्याच सुट्ट्या आल्या आहेत. शुक्रवार, शनिवार आणि रविवार असा लाँग विकेंड मिळण्याची संधी असलेल्या या सुट्ट्या पुढील प्रमाणे : 14 मार्च (होळी, दुसरा दिवस), गुड फ्रायडे (18 एप्रिल), स्वातंत्र्य दिन तसेच पारसी नववर्ष (15 ऑगस्ट), ईद-ए-मिलाद (5 सप्टेंबर)