Padma Shri Award 2025: सर्वायकल कँसर या गंभीर आजाराला आळा घालण्यासाठी आणि त्यावरील उपचारपद्धतींसाठी जगभरातील बरेच डॉक्टर आणि संशोधक प्रयत्नशील आहेत. कॅन्सरसारख्या गंभीर आजारासंबंधी संशोधनासाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या एम्सच्या माजी प्रोफेसर आणि प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीरजा भाटला यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. डॉ. नीरजा यांनी सर्वायकल कॅन्सरच्या बचावासाठी वॅक्सीनवर संशोधन केलं. या क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना पद्मश्री हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. नीरजा या एम्सच्या प्रसूती तसेच स्त्रीरोग विभागाच्या माजी प्राध्यापिका होत्या. बऱ्याच काळापासून सर्वायकल कॅन्सरला आळा घालण्यासाठी स्वदेशी लस तयार करण्याच्या त्या प्रयत्नात होत्या. अगदी कमीत कमी साधने उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी स्क्रीनिंग, एचपीव्ही चाचणी आणि परवडणाऱ्या लसींच्या निर्मितीवर संशोधन करण्यासाठी अनेक प्रकल्प राबवण्यात आले आणि डॉ. नीरजा यांनी त्या प्रकल्पांचे नेतृत्व केलं आहे. डॉ. भाटला यांच्या मते, स्वदेशी लसीच्या निर्मितीमुळे या आजाराला राष्ट्रीय पातळीवर आळा घालता येऊ शकतो.
सर्वायकल कॅन्सर म्हणजेच महिलांत्या गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. या आजाराचे मुख्य कारण मानव पॅपिलोमा व्हायरस (HPV) आहे. हा व्हायरस महिलांच्या संवेदनशील भागांना संक्रमित करतो. डॉ. नीरजा यांच्या मते, 35 ते 45 वर्षांच्या वयामध्ये एचपीवी टेस्ट करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. महिलांमध्ये अशा प्रकारचे संसर्ग आढळल्यास खाजगी रुग्णालये अधिक लस देण्याचे सल्ले देतात तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, दोन लसी या संसर्गापासून 50 ते 80 टक्के संरक्षण देण्यासाठी पुरेशा आहेत.
डॉ. नीरजा भाटला या आंतरराष्ट्रीय स्त्रीरोग आणि प्रसूती संघ (FIGO) च्या अध्यक्षा म्हणून FIGO स्त्रीरोग आणि कॅन्सर प्रतिबंध अॅप विकसित केला. हा अॅप डॉक्टर आणि रुग्णांसाठी सर्वायकल कॅन्सरच्या प्रतिबंधासाठी उपयुक्त ठरत आहे. डॉ. भाटला यांच्या नेतृत्वात या आजारावरील स्वदेशी लसीची निर्मिती झाली आणि या लसीचं ट्रायल शेवटच्या टप्प्यात असल्याचं सांगितलं जात आहे. या लसीचं ट्रायल यशस्वी झाल्यावर राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत 9 ते 14 वर्षांच्या मुलींना ही लस देण्यात येणार आहे जेणेकरुन या कॅन्सरच्या रुग्णांच्या संख्येत घट होईल.