उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शरद पवारांच्या भेटीला

सत्तास्थापनेबाबत होणार चर्चा...

Updated: Nov 11, 2019, 01:34 PM IST
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शरद पवारांच्या भेटीला title=

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. मुंबईतच दोघांमध्ये बैठक होत आहे.  या बैठकीत सत्तेस्थापनेबाबत चर्चा होणार असल्याचं कळतं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आता घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित आहेत. त्यामुळे आता शिवसेना-राष्ट्रवादी मिळून सत्ता स्थापन करतील हे जवळपास स्पष्ट झालं आहे.

शिवसेनेनं सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. संध्याकाळी ४ वाजता शिवसेनेचे नेते हे राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती आहे. राज्यपालांना भेटून शिवसेनेच्या ५६ आमदारांसह आठ अपक्ष आमदारांचा पाठिंबा असलेलं पत्र राज्यपालांना देणार आहेत. तसेच ४ वाजता राष्ट्रवादीची पुन्हा बैठक होणार आहे. तर काँग्रेसच्या निर्णयानंतप पुढचा निर्णय घेऊ असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. 

काँग्रेसच्या वर्किंग कमेटीची बैठक पार पडली असून आता महाराष्ट्रातील नेत्यांसोबत चर्चा करुन पुढील निर्णय जाहीर केला जाणार आहे. यासाठी काँग्रेसचे ६ नेते दिल्लीला रवाना झाले आहे. 

दुसरीकडे अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. एनडीएमधून बाहेर पडण्याची अट राष्ट्रवादीने शिवसेनेसमोर ठेवल्याची माहिती पुढे आली होती.