कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई : 'सोच बदलो मुंब्रा बदल गया है !' हे मुंब्राकरांच ब्रीदवाक्य आता सत्यात उतरले असून मुंब्राने आता मोकळा श्वास घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नागरिकांची इच्छा शक्ती आणि प्रशासनाचे पाठबळ असेल तर काय होऊ शकते ? याचे उत्तम उदाहरण सध्या मुंब्य्रातील रस्त्यांकडे पाहिल्यास मिळू शकते. गेली ३० वर्षे फेरीवाल्यांनी व्यापलेल्या मुंब्र्यातील रस्त्याने अखेर मोकळा श्वास घेतला आहे.
मुंब्रा म्हटलं की काहीजणांच्या अंगावर काटा आल्या शिवाय राहत नाही. अरुंद रस्ते, सर्वत्र वाहतूक कोंडी, वाढती लोकसंख्या त्या प्रमाणे दिवसेंदिवस वाढतच जाणाऱ्या फेरीवाल्यांचा त्रास मुंब्र्यातील नागरिकांना दररोज सहन करावा लागत होता. त्यामुळे मुंब्र्या बाहेरून येणाऱ्या नागरिकांना जणू नरक यातना सहन कराव्या लागत होत्या, मात्र आता मुंब्र्यातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असून आपण मुंब्र्यात नव्हे तर उच्चभ्रू शहरात फिरत असल्याचा भास मुंब्रातील नागरिकांना वाटू लागला आहे.
पूर्वी मुंब्रा ते पुढे शीळफाट्याला जाण्यासाठी फेरीवाल्यांनी रस्ता अडविल्यामुळे एक ते दीड तासांचा कालावधी वाहनचालकांना लागत होता. परंतू आता फेरीवाल्यांवर कारवाई होत असल्याने हा रस्ता मोकळा झाला असून अवघ्या १० मिनिटांत हे अंतर कापणे शक्य झाले आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा शहर विकास करीत आहेत. मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी कोंडलेल्या मुंब्र्याचा श्वास मोकळा करण्यास मदत केली आहे. रस्ता फुटपाथ अडवून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांसाठी गुलाब पार्क मार्केट हलवून ते मित्तलच्या जागेवर स्वरुपात हलविण्यात आले आहे. ठाणे महापालिकेचे सहायक आयुक्त महेश आहेर यांनी सांगितले.