धनुष्यबाणाची धार वाढली, शिवसेनेला मिळाला नवा ग्लॅमरस चेहरा

काँग्रेसने आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडणारा एक ग्लॅमरस चेहरा गमावला. 

Updated: Apr 19, 2019, 06:57 PM IST
धनुष्यबाणाची धार वाढली, शिवसेनेला मिळाला नवा ग्लॅमरस चेहरा title=

दीपाली जगताप-पाटील, झी २४ तास, मुंबई : काल परवा भाजपवर ज्यांनी सडकून टीका केली, त्या काँग्रेसच्या प्रियंका चतुर्वेदी काँग्रेस सोडून शिवसेनेत दाखल झाल्या आहेत. अर्थात राजकारणात काहीही घडू शकतं. पण प्रियंका चतुर्वेदींनी एका रात्रीत काँग्रेस का सोडली. याबाबत अनेकांना प्रश्न आहे.

काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी या अगदी रोज विविध वाहिन्यांवर दिसत होत्या. पण मॅडम ३६० अंशात बदल्या कशा हा अनेकांना पडलेला मोठा प्रश्न. दिल्लीतून काँग्रेस सोडून प्रियंका चतुर्वेदी चक्क शिवसेनेत दाखल झाल्या. अचानक मुंबईबद्दल त्यांना प्रेम वाटू लागलं. आणि मुंबईत सर्वाधिक पक्ष भावला तो शिवसेना. म्हणूनच निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवबंधन बांधून घेतलं.

मला मुंबई आवडते. शिवसेनेत राहून महिलांसाठी काम करायचंय असं वक्तव्य त्यांनी केलं. प्रियंका चतुर्वेदींच्या रुपानं शिवसेनेला नवा ग्लॅमरस चेहरा मिळाला आहे. हिंदी आणि इंग्रजीमध्ये खणखणीतपणे बाजू मांडू शकेल, असा प्रवक्ता. 
मुंबईतल्या उत्तर भारतीयांची मतं वळवण्यासाठी चांगला नेता, राष्ट्रीय पातळीवरचं महिला नेतृत्व मिळालं. शिवसेनेकडूनही लवकरच प्रियंका चतुर्वेदींना महत्त्वाची जबाबदारी मिळणार आहे. 

प्रियंका चतुर्वेदी या २००८ नंतर काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्या. त्या मूळच्या उत्तर प्रदेशातल्या आहेत. थोड्या काळातच त्यांचं काँग्रेसमधलं वजन वाढलं होतं. त्यामुळे दिल्ली काँग्रेसमधला गट अस्वस्थ होता. काही दिवसांपूर्वी मथुरेतल्या एका कार्यक्रमात काँग्रेसमधल्याच काही लोकांनी त्यांची छेड काढली. त्या लोकांना चतुर्वेदींनी पक्षातून निलंबित केलं पण काही दिवसांतच राज बब्बर यांनी या लोकांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेतलं. त्यामुळे प्रियंका चतुर्वेदी नाराज होत्या.

आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडणारा एक ग्लॅमरस चेहरा काँग्रेसनं गमावला. आता शिवसेनेच्या धनुष्यातले बाण आणखी धारदार आणि ग्लॅमरस होणार आहेत.