मुंबई : केंद्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. या विस्ताराकडे भाजपचा मित्रपक्ष आणि एनडीएचा घटक असलेली शिवसेना काहीशी अलिप्तपणेच पाहात आहे. असे असले तरी, शिवसेनेची नाराजी लपून राहीली नाही. शिवसेनेने ती केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार, बदल्या-बढत्यांचा उत्सव संपला आहे. त्यावर फार चर्चा न केलेली बरी!, अशा शब्दांत व्यक्त केली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्सव संपला या मथळ्याखाली लेख लिहीला आहे. या लेखात ठाकरे यांनी केंद्रात नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केले आहे. लेखात ठाकरे यांनी 'केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार ही भारतीय जनता पक्षाची राजकीय गरज होती. ती पूर्ण केली गेली इतकेच', अशी टपली भाजपला हाणली आहे. तसेच, 'केंद्रात मोदी सरकार स्थानापन्न होऊन आता तीन वर्षे झाली आहेत. मात्र तीन वर्षांनंतरही मंत्रिमंडळात प्रयोग सुरू आहेत.थोडक्यात मंत्रिमंडळ विस्तार, बदल्या-बढत्यांचा उत्सव संपला आहे. त्यावर फार चर्चा न केलेली बरी!', असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ' मोदी व अमित शहा या दोघांनी मिळून जे ठरवले तेच नव्या यादीत अवतरले व तेच राष्ट्रपती भवनात शपथविधीसाठी पोहोचले. २०१९ ची ही तयारी वगैरे असल्याचे सांगण्यात येत आहे. निवडणुका जिंकणे व सरकारे बनवणे हाच सध्या राजकीय, पण राष्ट्रीय खेळ झाला आहे. त्यामुळे सरकारी पटावरील प्यादीही त्याच पद्धतीने बसवली व चालवली जातात. कलराज मिश्र, बंडारू दत्तात्रेय व इतर पाच मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले. त्यांचे वय वाढल्याने मंत्रालयाची कामे नीट होत नाहीत असे एक कारण सांगण्यात आले. मात्र ज्यांचे वय वाढले नाही व जे तरुण आहेत त्यांच्याकडून असे कोणते तेज फाकले गेले आहे?', असा सवालही ठाकरे यांनी विचारला आहे.