मुंबई : राज्यात लागू करण्यात आलेल्या प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी २३ जूनपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे कोणीही प्लास्टिक पिशवी वापरली तर त्याला दंड भरावा लागणार आहे. विक्रेता तसेच ग्राहकांनी प्लास्टिक बंदीचे नियम तोडले तर त्याला ५ हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. त्यामुळे बाजारात जाताना ग्राहकाला काळजी घ्यावी लागणार आहे. कारण यापुढे कोणाच्या हातातही प्लास्टिक पिशवी दिसली तरी त्यालाही दंड होणार आहे.
राज्यात प्लास्टिक बंदीच्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासंदर्भात पर्यावरण विभागाने पावले उचलली आहेत. त्यानुसार ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या व ८ इंच बाय १२ इंच आकारापेक्षा कमी आकाराच्या प्लास्टिक पिशव्यांचे (कॅरी बॅग) उत्पादन, विक्री व वितरणावर बंदी घालण्यात आली आहे. पुढील टप्प्यात प्लास्टिक-थर्माकोलपासून बनविण्यात येणारे पेले, ताट, वाटय़ा, काटे, चमचे, फ्लेक्स, बॅनर्स, तोरण, इत्यादी वस्तूंचे उत्पादन, वापर, साठवणूक आणि विक्री करण्यावरही बंदी घालण्याचा विचार आहे. मात्र, २३ जून २०१८ पासून संपूर्ण राज्यात कडक अंमलबाजवणी करण्यात येणार आहे. जर कोणी प्लास्टिक पिशवी वापरताना दिसेल त्यांना तात्काळ दंड ठोठावण्यात येणार आहे.
राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दोन महिन्यांपूर्वी राज्यात पर्यावरण व नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक ठरणाऱ्या प्लास्टिकवर संपूर्ण बंदी घालण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पर्यावरण विभागाने त्याची कारवाई सुरू केली आहे. या संदर्भात एक आदेश जारी करण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा (नियंत्रण) या प्लास्टिक उत्पादन, विक्री व वापरावर बंदी घालणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपालिका-नगरपंचायतींचे मुख्य अधिकारी, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.