मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीचा (Andheri byelection) प्रचार जोरात सुरू झालेला असतानाच नवीन ट्विस्ट आला आहे. भाजपने (BJP) अंधेरी पोटनिवडणूक लढवू नये, असं पत्र राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लिहिलं आहे. त्यामुळं भाजप उमेदवार माघार घेणार का? याची चर्चा आता सुरू झाली आहे.
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे. मशाल विरुद्ध कमळ अशा थेट लढाईत आता रेल्वे इंजिनानं ड्रामॅटिक एन्ट्री केली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं ऋतुजा लटके विरुद्ध भाजपचे मुरजी पटेल असा थेट सामना इथं होतोय... मात्र भाजपनं अंधेरीची पोटनिवडणूक लढवू नये, अशी मागणी करणारं पत्र राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिलंय.
प्रिय मित्र देवेंद्र, सस्नेह जय महाराष्ट्र!
कै. रमेश लटके चांगले कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आमदार झाल्यास रमेश यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. त्यामुळं भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावं. जेव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेंव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं मनसेचं धोरण आहे. हे महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे, असं राज ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीत पराभव स्पष्ट दिसत असल्यानं भाजपनंच राज ठाकरेंना पत्र लिहायला लावलं की काय, असा सवाल ठाकरे गटानं उपस्थित केला आहे.
राज ठाकरेंनी शनिवारी वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची एकमेकांशी चर्चा झाली. रविवारी सकाळीच भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेतली. आणि त्यानंतर राज ठाकरेंचं हे पत्र जाहीर झालं. त्यामुळं भाजप आता उमेदवार मागे घेणार का, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पण गेल्या दोन दिवसांतली ही सगळी क्रोनोलॉजी लक्षात घेतली तर राजकारणात झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवण्याचा भाजप, शिंदे गट आणि मनसेचा प्रयत्न तर नाही ना ? अशी चर्चा सुरू झाली आहे.