मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आलं. लॉकडाऊन दरम्यान अनेक कंपन्या, उद्योग, कारखाने बंद झाले. लॉकडाऊनमुळे अनेक मजुरांच्या हातचं काम गेलं. लॉकडाऊन काळात हाताला काम नसल्याने मजूरांनी आपल्या गावची वाट धरली. प्रवासी मजूरांना आपल्या गावी पोहचवण्यासाठी सरकारकडून श्रमिक ट्रेन, बसेस सुरु करण्यात आल्या. मात्र आता हळूहळू उद्योग, कारखाने पुन्हा सुरु होत आहेत. परंतु मजूर गावी गेल्याने कामगारांची कमतरता आहे, त्यांना पुन्हा राज्यात येण्यासाठी रेल्वेची सोय करण्यात यावी, त्यासाठी मी रेल्वे मंत्र्यांशी बोलणार असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी 'झी २४ तास'च्या महाराष्ट्र एक पाऊल पुढे या विशेष ई-संवाद कार्यक्रमात बोलताना सांगितलं.
राज्य सरकारला कोरोनाला रोखण्यात हवं तितकं यश मिळालं नाही. पुन्हा एकदा कसं उभं राहायचं हा मोठा प्रश्न असल्याचं आठवले म्हणाले. परंतु महाराष्ट्र मोठं राज्य आहे, मोठे उद्योग महाराष्ट्रात आहेत. चीनमधून येणारा माल थांबवण्याची गरज आहे. राज्यातच नवे उद्योग सुरु केल्यास इथल्या लोकांना त्याचा फायदा होईल. मजूर, कामगारांसाठी काम करण्याची गरज आहे. कोरोनाला घालवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, आणखी काही नवे उद्योग सुरु करण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.
कोरोना संकटात भारत सरकारने राज्याला मोठी मदत केली आहे. सरकारची राज्याला मदत करण्याची पूर्ण तयारी आहे. सरकारने २० हजार कोटी रुपयाचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं. महाराष्ट्रात अनेक मोठे उद्योग असल्याने, त्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्र, मुंबईला होणार आहे, असं त्यांनी सांगतलं.