Chhatrapati Shivaji Maharaj Fort: छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. तर, त्यांचा वास्तवाने पावन झालेले गड-किल्ले महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एखाद्या मंदिरापेक्षा कमी नाहीत. छत्रपती शिवरायांच्या गड-किल्ल्यांना आता जागतिक दर्जा मिळू शकतो. यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ रविवारी पॅरिसला रवाना झाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांना वारसिक दर्जा मिळावा यासाठी शिवप्रेमी आग्रही आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही मागणी होत आहे. गडकिल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळाला तर जागतिक पातळीवरील पर्यटक महाराष्ट्रात गडकिल्ले पाहण्यासाठी येतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे. तसंच, छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथादेखील जगासमोर येईल.
महाराष्ट्र शासनाने 'मराठा लष्करी भूप्रदेश' (मराठा मिलीटरी लँडस्केप ऑफ इंडिया) या संकल्पने अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तमिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील किल्ले हे लढाऊ किल्ले आहेत. प्रत्येक किल्ल्याचे भौगोलिक आणि सांस्कृतिक असे महत्त्व आहे. गेले कित्येक वर्षे हे किल्ले ताठ मानेने इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. मोगल आणि इतर परकिय आक्रमणांमुळं काही किल्ल्यांची पडझड झाली आहे. या किल्ल्यांच्या डागडुजीसाठी पुरातत्व विभागाकडून कामे हाती घेण्यात आली आहेत. रायगडावर पुरातत्व विभागाकडून कित्येक वर्षांपासून ही कामे सुरू आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्यांमध्ये डोंगरी किल्ले, भुईकोट व सागरी किल्ल्यांचा समावेश आहे. त्यात महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू व गोवा या राज्यांतील किल्ल्यांचाही समावेश आहे. शिवाजी महाराज यांनी समुद्रातदेखील किल्ल्यांची उभारणी केली.