Video Deadly Yorker To Rohit Sharma: भारत आणि पाकिस्तानदरम्यान रविवारी झालेला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेचा सामना भारताने 6 विकेट्सने जिंकला. भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली या सामन्याचा खरा हिरो ठरला. भारताचा विजय आणि आपलं शतक विराटने सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर साकारलं. हे विराटचं एकदिवसीय सामन्यातील 51 वं तर पाकिस्तानविरुद्धचं चौथं शतक ठरलं. विराट समोर पाकिस्तानी गोलंदाज निष्प्रभ दिसले. मात्र विराट मैदानात येण्याआधी रोहित शर्माला सूर गवसल्याचं वाटत असतानाच शाही शाह आफ्रिदीच्या एका अप्रतिम चेंडूवर रोहित तंबूत परतला.
भारत आणि पाकिस्तानदरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेत झालेल्या सामन्यामध्ये भारताने 242 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलने सुरुवात संयमी केली. मात्र दुसऱ्याच ओव्हरनंतर आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानी गोलंदाजींची धुलाई सुरु केली. रोहित शर्माने दमदार फटकेबाजीला सुरुवात करत पहिल्या पाच ओव्हरमध्येच 3 चौकार 1 षटकार लगावत 14 बॉलमध्ये 20 धावा केल्या. पाचव्या ओव्हरमध्ये पाचव्या चेंडूवर रोहितने शाहीन शाह आफ्रिदीला कव्हरवरुन चौकार लगावला. यानंतर पुढच्याच चेंडूवर शाहीन शाह आफ्रिदीने इतका सुंदर यॉर्कर टाकला की रोहित शर्माला चेंडू कळलाच नाही आणि रोहित क्लीन बोल्ड झाला.
रोहितला शाहीन शाह आफ्रिदीने बाद करण्याची ही अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिसरी वेळ ठरली. शाहीन शाह आफ्रिदीने रोहितला क्लिन बोल्ड केल्यानंतर हात उचावून आपलं खास सेलिब्रेशनही केलं. शाहीन शाह आफ्रिदीने रोहितला टाकलेला चेंडू हा त्याच्या सर्वोत्तम गोलंदाजीचं उदाहरण असल्याचं अनेक पाकिस्तानी चाहत्यांनी सोशल मीडियावर म्हटल्याचं दिसून आलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...
शाहीन शाह आफ्रिदीने आतापर्यंत अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 60 बॉल टाकले असून त्यावर रोहितने 53 धावा केल्यात. रोहितला शाहीन शाह आफ्रिदीने तीन वेळा आऊट केलं आहे. रोहितने शाहीन शाह आफ्रिदीला 6 चौकार आणि तीन षटकार लगावले आहेत. 2021 मध्ये याच मैदानावर अशाच यॉर्करने शाहीन शाह आफ्रिदीने रोहितला बाद केलेलं. मात्र त्यावेळेस रोहित एलबीडब्ल्यू झालेला. त्याचा आणि कालच्या सामन्यातील व्हिडीओ आयसीसीने शेअर केला आहे.
दरम्यान, भारताचा पुढील सामना आता 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. न्यूझीलंडच्या संघाविरुद्ध आयसीसीच्या मालिकांमध्ये भारताची कामगिरी म्हणावी तितकी प्रभावी राहिलेली नाही. त्यामुळेच आता 2 मार्चच्या सामन्यात भारत कशी कामगिरी करतो याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे.