सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजानन मारणे यांच्या भेटीवरून टीका होत असतानाच आता कुख्यात गुंड हेमंत दाभेकरने मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीवरुन आता चर्चा सुरु झाली आहे. उल्हासनगरमध्ये घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर वातावरण तापलेलं असताना श्रीकांत शिंदे यांच्या कुख्यात गुंडाच्या सोबतच्या भेटीने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गुंड हेमंत दाभेकर हा जामीनावर बाहेर असून तो मृत शरद मोहोळच्या जवळचा आहे. खासदार संजय राऊत यांनीही हा फोटो पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला आहे.
डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने गुंड हेमंत दाभेकरने वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हेमंत दाभेकर हा कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या गुन्ह्यात साथीदार आहे. गुंड किशोर मारणे खून प्रकरणी शरद मोहळ सोबत हेमंत दाभेकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. हेमंत दाभेकर हा जामिनावर बाहेर असून, शरद मोहोळ याचा अत्यंत जवळचा व्यक्ती मानला जातो. यातच दाभेकरने थेट वर्षा बंगल्यावर जाऊन खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने खळबळ उडाली आहे.
या भेटीमुळे नेमकं राज्यकर्त्यांचा गुन्हेगारांसोबत काय काम आहे? असा मोठा प्रश्न तर सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. गुंड हेमंत दाभेकर हा गुंड किशोर मारणेच्या खून प्रकरणात शरद मोहोळ सोबत शिक्षा भोगत होता. यासोबत त्याच्यावर खंडणी, अपहरण, खून अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. वाढदिवसाचं निमित्त असलं तरी मात्र या भेटीचं काही वेगळं कारण होतं का? अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
संजय राऊतांची टीका
मा. गृहमंत्री देवेन्द्रजी
जय महाराष्ट्र!
महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे.पोलिस स्टेशन मध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात!
गुंडांचे इतके बळ का वाढले?
या परिस्थितीस जबाबदार कोण?
काल सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील… pic.twitter.com/jnmgurI5gm— Sanjay Raut (@rautsanjay61) February 5, 2024
या भेटीचा फोटो खासदार संजय राऊत यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारला घेरलं आहे. 'मा. गृहमंत्री देवेन्द्रजीजय महाराष्ट्र! महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे. पोलिस स्टेशन मध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात! गुंडांचे इतके बळ का वाढले? या परिस्थितीस जबाबदार कोण? काल सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण याचा शोध घ्या? मग राज्यातील गुंडशाही कोण पोसत आहे ते कळेल? गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट आहेत!', अशी पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे.
पार्थ पवारांची गुंड गजानन मारणेसोबत भेट
राष्ट्रवादीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वी कुख्यात गुंड गजानन मारणे याची कोथरूड येथे भेट घेतली होती. त्यावेळी पार्थ पवारांसोबत पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी देखील होते. पार्थ पवार यांच्या या भेटीवरुन विरोधकांनी जोरदार टीका केली होती. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, ती अतिशय चुकीची गोष्ट घडलेली असून मी त्याबद्दल माहीती घेत आहे, असे म्हटलं होतं.