New Thane Railway Station: ठाणे स्थानकात प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळलेली असते. दररोज जवळपास लाखो प्रवासी ठाणे स्थानकातून प्रवास करतात. ठाणे स्थानकातील गर्दीचा ताण हलका करण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न सुरू आहे. ठाणे आणि मुलुंड दरम्यान आणखी एक स्थानक उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. या प्रकल्पासाठी आता रेल्वेकडून 185 कोटींचा निधी देण्यात आला आहे. 2025 पर्यंत ठाणे-मुलुंड दरम्यान हे नवीन स्थानक तयार होण्याची शक्यता आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्लॅटफॉर्मच्या कामासाठी, रेल्वे रूळ आणि इतर सुविधांसाठी 185 कोटींचा निधी मंजुर केला आहे. त्यानंतरच या स्थानकाच्या कामाला गती आली आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. नवी दिल्लीतील रेल भवनमध्ये अश्विनी वैष्णव यांनी घेतलेल्या बैठकीबद्दल ही घोषणा करण्यात आली. या बैठकीत ठाणे नगर निगम (टीएमसी)चे आयुक्त सौरभ राव, ठाणेचे खासदार नरेश म्हस्के आणि कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे उपस्थित होते.
या प्रकल्पासाठी एकूण खर्च हा 264 कोटींचा आहे. यातील एकूण 185 कोटी हे प्रशासनिक भवन, रेल्वे रूळ टाकणे आणि प्लॅटफॉर्मच्या कामांसाठी असणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 2019मध्ये या प्रकल्पाचे 30 टक्के काम पूर्ण झाले आहे. सप्टेंबर 2025पर्यंत 100 टक्के काम पूर्ण होईल. एकदा का ही योजना सुरू झाली की ठाणे स्थानकातील गर्दी कमी होणार आहे.
ठाण्याच्या जवळ असलेले मुलुंड आणि घोडबंदर परिसरातील हजारो प्रवासी या नवीन स्थानकाचा लाभ घेऊ शकणार आहेत. यामुळं प्रवास देखील सुखाचा होणार आहे. घोडबंदर रोड, वाघळे इस्टेट आणि पोखरण येथील नागरिकांना लोकल प्रवास करणे सोप्पं होणार आहे. नागरिकांचा वेळ आणि प्रवास दोन्हीही वाचणार आहेत. सध्या येथून ठाणे स्थानक गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. कधी कधी वाहतुक कोंडीचा सामना देखील करावा लागतो. नवीन ठाणे स्थानक उभारल्यानंतर या स्थानकात मुंबईला जाणाऱ्या गाड्या होम प्लॅटफॉर्मवरुन सुटणार आहेत. तसंच, कर्जत-कल्याणच्या दिशेला जाणाऱ्या गाड्या दोन व तीन प्लॅटफॉर्मवरुन सुटणार आहेत.
- नवीन स्थानकाचा डेक तीन स्वतंत्र उन्नत पदपथांनी जोडला जाईल.
- ज्ञान साधना महाविद्यालयासमोरून नवीन स्थानकापर्यंतचा २७५ मीटर लांबीचा रस्ता असेल
- मनोरुग्णालयासमोरून नवीन स्थानकापर्यंत ३२७ मीटर लांबीचा मार्ग असणार आहे.
- मुलुंड एलबीएस टोल प्लाझा ते नवीन स्थानकापर्यंत ३२५ मीटर लांबीचा मार्ग असेल.
- तिन्ही मार्ग 8.50 मीटर रुंद असतील.
- स्थानक 275 मीटर लांब आणि 34 मीटर रुंद असेल
- जमिनीपासून सुमारे 9 मीटर उंचीवर असेल.