Mumbai Local Train Updates: मुंबईमध्ये मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना उशीरा धावणाऱ्या लोकल ट्रेन ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. अगदी दररोज न चुकता मध्य रेल्वेच्या ट्रेन उशीराने धावतात आणि त्यामुळे अनेकांना ऑफिसमध्ये लेटमार्क लागतो तर काहींची नियोजित कामं रखडतात. मात्र मध्य रेल्वेच्या गाड्या मागील काही काळापासून उशीराने धावण्यासाठी या मार्गावरील 6 लोकल ट्रेन्सच कारणीभूत असल्याचं प्रवासी संघटनांचे म्हणणं आहे. या सहा लोकल ट्रेन कोणत्या आणि नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात...
सध्या मध्य रेल्वेच्या मार्गावर वाढलेल्या गर्दीचा भार सोसता येईल एवढ्या प्रमाणातही रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या होत नाहीत. त्यातच या मार्गावरील एका स्थानकावरुन होम प्लॅटफॉर्म नसतानाही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी गाड्या सोडल्या जात आहेत. याच सहा गाड्यांमुळे संपूर्ण मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडत असल्याचं प्रवासी संघटनांचं म्हणणं आहे. आता हे स्टेशन कोणतं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर प्रवाशी ज्या लोकल ट्रेन्सला दोष देत आहेत त्या लोकल ट्रेन सीएसएमटी ते घाटकोपर स्थानकादरम्यान धावतात. घाटकोपर स्थानकामध्ये होम प्लॅटफॉर्म म्हणजेच गाड्या जिथून सुरु होतात असा स्वतंत्र प्लॅटफॉर्म नसतानाही सीएसएमटीसाठी गाड्या सोडल्या जातात. अप आणि डाऊन मार्गावर घाटकोपर ते सीएसएमटी अशा सहा फेऱ्या होतात. मात्र मधूनच सुटणाऱ्या या सहा गाड्यांमुळे ठाण्याच्या बाजूने अप मार्गावर येणाऱ्या आणि कुर्ल्याकडून डाऊन मार्गावर जाणाऱ्या लोकल ट्रेन्सचं वेळापत्रक कोलमडत आहे. या सहा ट्रेन्समुळेच मध्य रेल्वेचा वक्तशीरपणा घड्याळ्याच्या काट्यावर न चालता स्वैरपणे होताना दिसतोय.
एकीकडे घाटकोपरवरुन गाड्या सोडल्या जात असतानाच दुसरीकडे कल्याण आणि डोबिंवली स्थानकांवरुन पुरेश्या लोकल नसल्याने मागील काही काळात वेगवेगळ्या अपघातांमध्ये काही प्रवाशांना प्राण गमवावे लागलेले आहेत. त्यामुळे घाटकोपरसारख्या मधल्याच स्टेशनवरुन सीएसएमटीसाठी गाड्या सोडण्याऐवजी या गाड्यांच्या फेऱ्या ठाणे किंवा अगदी कल्याण, डोंबिवलीपर्यंत वाढवाव्यात अशी मागणी केली जात आहे. नवीन वेळापत्रकामध्ये हा बदल करावी अशी मागणी प्रवासी संघटनांकडून होत असून ही मागणी जोर धरु लागली आहे. एकीकडे कळव्यासारख्या ठिकाणी गर्दी असतानाही होम प्लॅटफॉर्म नसल्याने गर्दीतच प्रवाशांचा चढावं लागत आहे. दुसरीकडे ठाणे-ऐरोली लिंकचं काम रखडलं असल्याने ट्रान्स हार्बरच्या माध्यमातून ठाणे स्थानकावर प्रवाशांचा भार वाढला आहे. बऱ्याच वाढील रेल्वे मार्गिकांची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्ष काम मात्र रखडलं आहे. त्यामुळेच ठाण्यापुढे लोकल ट्रेनच्या फेऱ्या वाढवण्यात अडचणी येत आहेत.
कल्याण-डोंबिवलीच्या प्रवाशांना जीव मुठीत धरुन मध्य रेल्वेच्या मार्गावर प्रवास करावा लागत असताना दुसरीकडे घटाकोपरवरुन सीएसएमटीसाठी लोकल सोडल्या जात असल्याने आणि या लोकल मूळ प्लॅटफॉर्मवरुनच सोडल्या जात असल्याने या फेऱ्या चालवण्यासाठी नियोजित वेळापत्रकात 15 ते 20 मिनिटांचा अधिकचा वेळ वाया जातो. या 6 लोकलमुळे मध्य रेल्वे रोज 15 ते 20 मिनिटं उशीराने धावते असं प्रवासी संघटनांचं म्हणणं आहे. बरं या लोकलच्या फेऱ्या अनेक वर्षांपासून सुरु असून तितक्याच वर्षांपासून या फेऱ्यांना प्रवाशी संघटनांचा विरोध कायम आहे. या फेऱ्या किमान ठाण्यापर्यंत किंवा अगदी कल्याण, डोंबिवलीपर्यंत वाढवाव्यात अशी मागणी केली जात आहे. व्यापाऱ्यांसाठी या लोकल चालवल्या जात असल्याचंही काही प्रवासी संघटनांचं म्हणणं असून यामुळे घाटकोपर पुढे प्रवास करणाऱ्या कल्याण-डोंबिवली तसेच ठाण्याकडील प्रवाशांना नसता मनस्ताप सहन करावा लागत आहे.
घाटकोपर ते सीएसएमटी मार्गावर चालवल्या जाणाऱ्या 6 लोकल फेऱ्या रद्द कराव्यात किंवा त्यांचा विस्तार किमान ठाण्यापर्यंत करावा.
या लोकल ट्रेन घाटकोपर ते सीएसएमटी मार्गावर सकाळी 9.16, 9.46 आणि 10.35 या वेळेत धावतात.
तर सीएसएमटीवरुन घाटकोपरला येणाऱ्या ट्रेन सकाळी 8.37, 9.09 आणि 9.57 या वेळेत धावतात.
या गाड्या घाटकोपर स्थानकावरुन मुख्य प्लॅटफॉर्मवरुन सुटत असल्याने घाटकोपर स्थानकातून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकल ट्रेन उशीराने धावतात.
ऐन पिक अवर्समध्ये म्हणजेच सकाळी 7 ते 10 च्या दरम्यान या सहा फेऱ्या असल्याने अप तसेच डाऊन मार्गावरील वाहतूक रखडते.