Mumbai Crime : पाण्याने भरलेल्या बादलीमध्ये बुडवून वृद्ध महिलेची हत्या केल्याचा प्रकार मुंबईच्या (Mumbai Crime) मालाड परिसरात घडला आहे. घरकाम करणाऱ्या महिलेनेच प्रियकर आणि मुलाच्या सहाय्याने हे धक्कादायक कृत्य केल्याचे समोर आले आहे. वृद्ध महिलेच्या निर्घृण हत्येनंतर घरकाम करणाऱ्या महिलेने सोन्याची चैन, मोबाईल फोन आणि स्मार्ट वॉच घेऊन पळ काढला आहे. या प्रकरणी मालाड पोलिसांनी (Malad Police) तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. या हत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुंबईच्या मालाड परिसरात राहणाऱ्या या वृध्द महिलेची तिच्याच घरी काम करणाऱ्या महिलेने प्रियक आणि मुलाच्या मदतीने कट रचून हत्या केली आहे. मारी सिलिन विल्फ्रेड डिकोस्टा असे या 69 वर्षीय वृद्ध महिलेचे नाव असल्याचे समोर आले आहे. डिकोस्टा यांच्या घरी काम करणाऱ्या शबनम शेखने त्यांची बाथरूममध्ये पाण्याने भरलेल्या बादलीत तोंड बुडवून निर्घृणपणे हत्या केली आहे. या प्रकरणी मालाड पोलीस आणि गुन्हे शाखेने शबनम शेख, तिचा मुलगा आणि प्रियकराला ताब्यात घेतले आहे.
आरोपी शबनम शेख ही गेल्या 25 वर्षांपासून मारी डिकोस्टा यांच्या घरी काम करत होती. गुरुवारी संध्याकाळी मारी डिकोस्टा यांचा नातू कामानिमित्त बाहेर गेलेला असताना आरोपींनी हे धक्कादायक कृत्य केले. नातू बाहेर गेलेला असताना शबनम शेखने प्रियकर आणि मुलासह डिकोस्टा यांची पाण्याने भरलेल्या बादलीत तोंड बुडवून त्यांची हत्या केली. यानंतर घरातील सोन्याची चैन, मोबाईल आणि स्मार्ट वॉच घेऊन आरोपींनी पळ काढला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
गुरुवारी संध्याकाळी जेव्हा डिकोस्टा यांनी फोन उचलला नाही तेव्हा नातू निल रायबोले याने शेजारच्यांना फोन केला. शेजारच्यांनी डिकोस्टा यांच्या घरी जाऊन पाहणी केली तेव्हा त्यांना धक्काच बसला. पाण्याने भरलेल्या बादलीत यांचा तोंड बुडवलेला मृतदेह बाथरुममध्ये आढळून आल्याचे पाहताच शेजारच्यांनी याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता साडेचारच्या सुमारास डिकोस्टा यांच्या घरात काम करणारी शबनम आणि तिचा मुलगा बाहेर पडताना दिसला. यावेळी त्यांच्यासोबत मास्क आणि टोपी घातलेला एक अनोळखी इसमही असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले.
शबनमने घरात प्रवेश केल्यानंतर ती अनोखळी व्यक्तीही डिकोस्टा यांच्या घरात शिरली आणि काही मिनिटांनी घराबाहेर पडली. यानंतर डिक्सोटा यांच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर शबनम आणि तिचा मुलगा त्यांच्या घरी गेले होते. मात्र काही वेळाने कोणालाही काहीच न सांगता तिथून निघून गेले. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासल्यानंतर शबनम आणि तिच्या मुलाचा शोध सुरु केला. त्यानंतर शबनमला मालवणी येथून तर तिचा प्रियकर आणि मुलाला मालाड येथून ताब्यात घेतले.