स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : दुचाकीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून शिवकुमार रोशनलाल शर्मा (45) यांना हेल्मेटने मारहाण करुन त्यांची हत्या करणाऱ्या दुक्कलीपैकी एकाला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. रेहान शेख (20) असे या आरोपीचे नाव असून पळून गेलेल्या दुसऱ्या आरोपीचे नाव फैजान शेख (20) असे आहे. पोलिसांनी या दोघांचा बीकेसीमध्ये शोध घेऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, रेहान त्यांच्या हाती लागला. मात्र, फैजान पळुन जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी आता फैजानचा शोध सुरु केला आहे. (Navi Mumbai News)
आयटी व्यावसायिक असलेले या घटनेतील मृत शिवकुमार रोशनलाल शर्मा हे गत 2 फेब्रुवारी रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरुन खारघर स्वप्नपूर्ती मधील आपल्या घरी जात होते. बेलपाडा ते उत्सव चौक दरम्यानच्या रस्त्यावर दुचाकीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरुन शिवकुमार यांचा स्कुटीवरुन जाणाऱ्या आरोपी तरुणांसोबत वाद झाला. यावरून त्यांच्या मध्ये भांडण झाल्यानंतर स्कुटीवरील एका तरुणाने शिवकुमारच्या डोक्यामध्ये हेल्मेटने प्रहार केले होते.
दरम्यान, हे दोन्ही आरोपी मुंबईतील नागपाडा आणि आग्रीपाडा येथील रहिवासी असून दोघेही डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होते. पोलिसांनी अटक केलेला आरोपी रेहान शेख हा त्यादिवशी स्कुटीवर पाठीमागे बसला होता. तर स्कुटी चालवणारा, हेल्मेटने मारहाण करणारा आरोपी फैजान शेख हा अद्याप फरार आहे. गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपीला खारघर पोलिसांच्या स्वाधीन केले असून पोलिसांनी त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले आहे.
पोलिसांनी या घटनेतील सीसीटीव्ही फुटेजचे विष्लेशण तसेच प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले असता, सदर घटनेच्यावेळी शिवकुमार शर्मा यांनी आरोपींना दोनदा ओव्हरटेक केले होते. तसेच त्यांना ओव्हरटेक करताना तो त्यांच्यावर थुंकला होता, त्यामुळे दोन्ही आरोपींना राग आला होता. त्यानंतर शिवकुमार शर्मा आणि दोन्ही आरोपी बेलपाडा आणि उत्सव चौक दरम्यान थांबल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर त्यांच्यात भांडण सुरु झाले असता, शिवकुमार शर्माने एका आरोपीला लाथ मारली, त्यानंतर आरोपीने त्याचे हेल्मेट काढून शिवकुमार शर्मा यांच्या डोक्यावर अनेक वेळा मारल्याचे पोलिसांच्या तपासात आढळुन आले आहे.