Maharashtra Weather News : उत्तरेकडील राज्यांमध्ये असणारा थंडीचा कडाका काही प्रमाणात कमी होत असतानाच इथं मुंबईमध्येही तापमानात झालेली वाढ कमी होत असून, हवाहवासा गारठा पुन्हा चाहूल देऊ लागला आहे.
साधारण आठवड्याभरापूर्वी उत्तर भारतातून दक्षिणेच्या दिशेनं वाहणाऱ्या वाऱ्याच्या मार्गात अडथळे निर्माण झाल्याने मुंबईतील थंडी कमी झाली होती. आता मात्र वाऱ्याच्या मार्गातील हे अडथळे दूर झाले असून, हे वारे नाशिक, ठाणे, नवी मुंबईसह मुंबईच्या दिशेने वाहणार आहेत. त्यामुळे उन्हाच्या दाहकतेनं होरपळणाऱ्या मुंबईच्या तापमानात समाधानकारक घट होणार असून, पुढच्या 24 तासांसह आणखी काही दिवसही शहरातील वातावरणात गारठा अनुभवता येणार आहे.
हवामानातील या बदलासह सध्या कमालीचं प्रदूषण असणाऱ्या मुंबईत हवेचा दर्जा पुन्हा सुधारण्यास सुरुवात झाल्यामुळं नागरिकांच्या आरोग्यासंदर्भातील तक्रारीसुद्धा आता मागे पडू लागल्या आहेत.
इथं मुंबईत तापमानात घट झालेली असतानाच पश्चिम महाराष्ट्र पट्ट्यामध्ये मात्र किमान तापमानात वाढ होत असल्याचं चित्र आहे. पुणे शहरातील कमाल- किमान तापमानात दिवसेंदिवस वाढच होत असून, इथं उष्मा अधिक जाणवू लागला आहे.
राज्यातील काही भागांमध्ये फेब्रुवारी महिन्यात थंडीत काहीशी वाढ होते. तर, कुठे उष्णतेचा मारा पाहायला मिळतो. काहीसं असंच हवामान सध्या राज्यात पाहायला मिळत असून, मुंबईप्रमाणेच निफाडमध्येही पारा 8 अंशांवर गेल्यामुळं हवामानाचा काहीच नेम नाही असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
दरम्यान, 12 ते 14 फेब्रुवारी दरम्यान उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि पुण्यात किमान तापमानात 2-4°C घट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभाग आणि तज्ज्ञांनी वर्तवला आहे. पश्चिमी झंझावात ओसरल्यानंतर पुन्हा उत्तरेकडील वारे उत्तर-मध्य महाराष्ट्रात, विदर्भासह उर्वरित क्षेत्रात प्रवेश करत असल्यामुळं बुधवारी रात्रीपासून 14 फेब्रुवारीच्या सकाळपर्यंत हे वारे राज्यात शिरकाव करणार असून त्यामुळे रात्रीच्या तापमानात घट होण्याची शक्यता आहे.