'अजितदादांना ५ वर्ष संपवण्याचा प्रयत्न झाला'; आव्हाडांचा आरोप

अजित पवार यांनी आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली.

Updated: Sep 28, 2019, 02:53 PM IST
'अजितदादांना ५ वर्ष संपवण्याचा प्रयत्न झाला'; आव्हाडांचा आरोप title=

मुंबई : अजित पवार यांनी आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली. अजित पवारांनी राजीनामा का दिला, याचं कारण राष्ट्रवादीच्या कोणत्याच नेत्याला माहिती नव्हतं. अजित पवार यांनी राजीनामा द्यायच्या आधी आपल्याशी कोणतीही चर्चा केली नसल्याचं खुद्द शरद पवार म्हणाले. यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादांना संपवण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

पुढच्या ५ वर्षात जो मुख्यमंत्री होऊ शकेल, तसंच सत्ताधाऱ्यांना जाब विचारू शकेल, असं अजित पवारांचं नेतृत्व आहे. पण त्यांना संपवण्याचं काम गेली ५ वर्ष सुरू आहे. १४ तास विधानसभेत बसणारा आणि प्रत्येक विषयाला अजित पवार हात घालतात, पण प्रत्येक ३ महिन्यांनी त्यांची बदनामी करणाऱ्या गोष्टी छापून यायचा. यामुळे अजित पवार उद्विग्न होते. आपल्यामुळे कुटुंबाला आणि काकांना त्रास होत असल्याची भावना त्यांना खात आहे, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

दरम्यान भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी आव्हाड यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. सिंचन घोटाळ्याची चौकशी आणि राज्य सहकारी बँकेची चौकशी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना सुरु झाली, असं गिरीश महाजन म्हणाले.

राजीनामा देण्याआधी अजित पवार यांचं त्यांचे पूत्र पार्थ पवार यांच्याशी चर्चा केली. राजकारण खालच्या पातळीला गेलं आहे, त्यामुळे राजकारण सोडून आपण शेती करु, असं अजित पवार यांनी पार्थला सांगितल्याचं शरद पवार यांनी पुण्याच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं.

राजीनामा देताना अजित पवार यांनी कोणालाच सांगितलं नाही. एवढच नाही तर अजित पवार यांनी आपल्याशी चर्चा केली नसल्याचं पवारांनी काल सांगितलं. माझे नाव महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळ्यात आल्याने ते अस्वस्थ होते. अस्वस्थता आणि उद्विग्नेतून त्यांनी हा निर्णय घेतला असावा. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असवा, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.