मुंबई : सकाळी सकाळी मुंबई आणि परिसराला दिलासा देणारी बातमी. उपग्रहानं दिलेल्या ताज्या छायाचित्रांनुसार मुंबई आणि उत्तर कोकणावर असलेलं ढगाचं अच्छादन आणखी उत्तरेला सरकले आहे. त्यामुळे आज मुंबईतला पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
कुलाबा वेधशाळेने काल मुंबई,ठाणे, कल्याण, डहाणू परिसरात आजही अतिवृष्टीचा इशारा दिला होता. मात्र उपग्रहाने दिलेल्या या ताज्या छायाचित्रांमुळे हा धोका कमी झाल्याचं स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, शहरात हिंदमाता, लालबाग, दादर, परळ भागात पाणी अजुनही साचलेले असून अनेक ठिकाणी सकल भागात पाणी आहे. गेल्या १८ तासापासून मुंबईकरांची पाऊस कोंडी अजूनही सुटलेली नाही. रात्रभरात पावसाचा जोर ओसरला असला तरी मुंबईची लाईफलाईन मात्र अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. मध्य आणि हार्बरची वाहतूक अजूनही ठप्पच आहे. मात्र, पश्चिम रेल्वे धिम्यागतीने सुरु आहे.
शेकडोच्या संख्येनं प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रात्रभर खोळंबून राहिले आहे. पण सीएसएमटी ते ठाण्यापर्यंत वाहतूक अजूनही बंदच आहे. ठाण्याहून बदलापूर आणि टिटवाळ्याकडे वाहतूक सुरु आहे. शिवाय हार्बरची सेवाही पूर्णपणे बंद आहे.
ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर सेवा सुरू त्यामार्गे नवीमुंबईकडे जाणे शक्य आहे. दरम्यान आज पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरू झाली असून धीम्या गतीने काही होईन लोकल सुरू आहेत. तर दुसरीकडे मुंबई-पुणे एक्सप्रेसवे सुरळीत सुरू आहे.