Corona Returns : देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढू लागल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. देशात गेल्या चोवीस तासात तब्बल 5,335 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. 195 दिवसांनंतर कोरोना रुग्ण इतक्या मोठ्या प्रमाणावर रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. याआधी 23 सप्टेंबर 2022 रोजी 5,383 रुग्ण आढळले होते. राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. गेल्या 24 तासात राज्यात 803 नव्या कोरोना रुग्णांचं निदान झालं आहे. तर 3 जणांच्या मृत्यूची नोंद (Corona Death) करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर
1.82% इतका आहे.
आज राज्यात 687 रुग्ण बरे होऊन घरी गेले, राज्यात आजपर्यंत एकूण 79,95,233 करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.13% इतकं झालं आहे. सध्याच्या कोव्हिड संदर्भातील आंतरराष्ट्रीय परिस्थिीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकराच्या सूचनेनुसार 23 डिसेंबर 2022 पासनू राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचं सर्वेक्षण करण्यात आलं. या मध्ये प्रवाशांचं थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत असून 2 टक्के प्रवाशांचे नमुने कोविडसाठी घेतले जात आहेत.
मुंबईत सर्वाधिक रुग्ण
राज्यातील एकुण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे एकट्या मुंबईत आहेत. गेल्या चोवीस तासात मुंबीत 216 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या 1 हजार 268 सक्रिय रुग्ण आहेत. सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे मुंबईत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
राज्यात मॉकड्रील घेणार
राज्यात सध्याच्या घडीला 3987 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. राज्यात 13 आणि 14 एप्रिल रोजी मॉकड्रिल घेतलं जाणार आहे. संपूर्ण राज्यात कोविड आढावा घेतला जाणार आहे. राज्यात सर्वेक्षण आणि परिक्षण सुरु आहे. काळजी करण्याचे कारण नाही. मात्र ताप, खोकला, सर्दी अंगावर काढू नका. त्वरित डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार घ्या. कोरोना असेल तरी 48 ते 72 तासात रुग्ण बरा होतो, असं आरोग्यमंत्र्यांनी यांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकार सतर्क
देशातल्या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सतर्क राहण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्या आहेत. त्यावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावलीय. गेल्या दोन दिवसांत कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये सुमारे 80 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या दोन दिवसात 2300 हून अधिक कोविड रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालं आहे.