मुंबई : भाजप आणि शिंदे गट एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली. पण या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं दिसतंय आणि याला निमित्त ठरलंय शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर केलेला आरोप.
दीपक केसरकर यांचा आरोप
अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणात युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची बदनामी केली गेली. यात भाजपचे नेते आणि मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचाही सहभाग होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या कानावर ही वस्तुस्थिती घालून राणे काय बोलतायत हे सांगितले. त्यानंतर मोदी आणि ठाकरे यांच्यात संवाद सुरु झाला. मोदी यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार होते, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला.
मोदी आणि ठाकरे यांच्याच संवात सुरु होता. त्याचवेळी नंतर 12 आमदारांचे निलंबन झाले. नंतर नारायण राणे यांना केंद्रात घेतले गेले. यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले. ही गोष्ट दोनतीन लोकांना माहिती होती. त्यात रश्मी ठाकरे याही होत्या. एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवा, आपण एकत्र येवू, असे उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्याला सांगितले.पण भाजप तयार झाली नाही, असा दावा दीपक केसरकर यांनी केला आहे.
आमदार नितेश राणे नाराज
दरम्यान, दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नितेश राणे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसांच्या त्यांच्या सागर बंगल्यावर भेट घेतली. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय.
हा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कानावर घालण्याचं आश्वासन फडणवीसांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.